

पणजी : भूषण आरोसकर सर्बियन दिग्दर्शक मिरोस्लाव्ह तेझिंच यांचा 'श्री वीक्स आफ्टर' हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ रहस्यकथेचा अनुभव देत नाही, तर मानवी मनातील अस्वस्थता, सामाजिक हिंसा आणि तरुण पिढीसमोरील गंभीर प्रश्नांचा विचार करायला भाग पाडतो. ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात समाविष्ट झालेला हा चित्रपट आपल्या गडद आशयामुळे विशेष लक्ष वेधून घेतो.
शाळेतील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर तीन आठवड्यांनी विद्यार्थ्यांची सहल आयोजित केली जाते. मात्र, प्रवासादरम्यान बसमध्ये बिघाड झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना एका दुर्गम भागातील जुन्या हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागतो.
या अनपेक्षित परिस्थितीत विद्यार्थ्यांमधील परस्परसंबंध, दडपलेले संघर्ष, रॅगिंग आणि हिंसक प्रवृत्ती हळूहळू समोर येऊ लागतात. सुरुवातीला साथी वाटणारी ही सहल पुढे मानवी स्वभावाचे भयावह पैलू उघड करणाऱ्या अनुभवात बदलते.
चित्रपटाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शकाने केलेली वातावरणनिर्मिती. जुनाट हॉटेल, एकाकी परिसर आणि पात्रांमधील वाढता तणाव यांचा वापर करून ते प्रेक्षकांच्या मनात सतत अस्वस्थता निर्माण करतात. भय निर्माण करण्यासाठी केवळ नाट्यमय प्रसंगांचा आधार न घेता शांतता, नजरा आणि संवादांमधील तणाव यांचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळे अनेक प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ परिणाम करतात.
छायाचित्रकार दाम्यान राडोवानोविच यांचे कॅमेरावर्क चित्रपटाच्या आशयाला महत्त्वपूर्ण पूरक ठरते. दृश्यांमधील अंधार, मर्यादित जागेचा वापर आणि पात्रांच्या मानसिक अवस्थेशी सुसंगत दृश्यस्वना यामुळे कथानकातील तणाव अधिक गडद होतो. ध्वनिरचनेचाही विशेष उल्लेख करावा लागेल. अनेक प्रसंगांमध्ये पार्श्वसंगीतापेक्षा ध्वनी आणि शांततेचा वापर अधिक परिणामकारक ठरतो. संकलनामुळे कथानकाची गती टिकून राहते आणि प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहते.
जोव्हान गिनीच, तिहाना लाझोविच, ब्रानिस्लाव्ह त्रिफुनोविच आणि अँजेला अलाविरेविच या कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. तरुण पात्रांच्या वर्तनातील अस्थिरता, भीती आणि आक्रमकता त्यांच्या अभिनयातून जाणवते. कलाकारांचा संयमित अभिनय चित्रपटाच्या वास्तववादी वातावरणाला बळकटी देतो. मात्र, चित्रपटातील हिंसक आणि निराशाजनक वातावरण काही प्रेक्षकांसाठी अस्वस्थ करणारे ठरू शकते. काही प्रसंगांमध्ये टोकाची मांडणी जाणवते, तर शेवटच्या भागातील घडामोडींना अधिक सुसंगत विस्तार मिळाला असता, असे वाटते. त्यामुळे चित्रपटाचा शेवट काही प्रश्न अनुत्तरित ठेवतो.
चित्रपट संवेदनशील प्रश्नांकडे पाहण्यास भाग पाडतो
एकूणच, 'थ्री वीक्स आफ्टर' हा केवळ रहस्य आणि थरारावर आधारित चित्रपट नाही. तरुण पिढीतील वाढती अस्वस्थता, शैक्षणिक वातावरणातील हिंसक प्रवृत्ती आणि समाजातील संवेदनशील प्रश्नांकडे पाहण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे. आशय, तांत्रिक गुणवत्ता आणि प्रभावी वातावरणनिर्मिती यांचा संगम साधणारा हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनापेक्षा अधिक काही देऊन जातो. मात्र, त्याचा गडद आशय आणि अस्वस्थ करणारी मांडणी यामुळे तो प्रत्येक प्रेक्षकाच्या आवडीचा ठरेलच असे नाही.