

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अचानक राज्यात दमट हवामान निर्माण झाल्याने काजू व आंबा पीक संकटात येण्याची भीती आहे. सध्या आंबा, काजूची झाडे चांगल्याप्रकारे मोहोरली आहेत. यावर्षी उत्पादन चांगले येईल, अशी आशा आहे.
सध्या थंडी कमी झाली असून उष्णता वाढली आहे. काही ठिकाणी अचानक दमट हवामान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात अनेक जातींच्या आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील माणकूर, हिलारिओ आणि मुसराद आंब्यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे, तर काजू फेणी, गोवा काजू आणि काजू बोंडू यांनाही भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
काजू पीक चांगले आले, तर गोवा काजू आणि काजू फेणीचे उत्पादन वाढणार आहे. यासाठी हवामान चांगले राहायला हवे. वातावरणात बदल होऊन हवामान दमट झाले, तर उत्पन्नात घट होऊ शकते. मागील पाच वर्षांत बदलत्या हवामानामुळे उत्पन्नात घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. उत्पादन कमी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.