

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. दुपारी २ वाजल्यापासून उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. या पावसाचा भातपिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे राजधानी पणजीत अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. काही भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
दुचाकीस्वारांससह पावसापासून बचाव करण्यासाठी पादचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. शुक्रवारी सकाळपासून राज्यात उष्ण आणि दमट वातावरण होते. मात्र, दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही भागांत पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यांवर पाणी साचले.
झाडांच्या फांद्या तुटून पडल्यामुळे मोठी झाडेही रस्त्यांवर कोसळली. काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले. हवामानाने दुपारी तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती, त्याच दरम्यान पाऊस पडला. हवामानाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तसेच विविध वातावरणीय कारणांमुळे शुक्रवारी राज्यात जोरदार पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात तापमानाची नोंद झाली असून, पणजीत कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमान झाले असून, आगामी २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
याशिवाय मृगागावध्ये ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तर २९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर पणजीतील किमान तापमान २६.२ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, आगामी २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील वातावरण पुन्हा कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील नान्नोडा-बांबर परिसर अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या वादळामुळे काजू, सुपारी, केळी तसेच नारळ, फनस आणि आंब्याच्या झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजखांभी मोडले असून वीज खात्याचे नुकसान झाले आहे.
बांबर येथून सुरू झालेले वादळ नानोडआपर्यंत घोंगवत गेले. या वादळामुळे परिसरातील शेती आणि बागायतींची मोठी हानी झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सकाळपासून संपूर्ण सत्तरी तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गर्जनासह पावसाला सुरुवात झाली. दुपारी तीन ते सव्वातीनच्या सुमारास बांबर येथे चक्रीवादळाचा पट्टा निर्माण झाला.
यामुळे विविध प्रकारच्या झाडांची पडझड झाली. काजू आणि सुपारीच्या बागायतीतील झाडांचे नुकसान झाले असून, सुपारीची झाडे मोडून पडली आहेत. केळीच्या बागायतदारांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्यासह अन्य वृक्षही उन्मळून पडले आहेत. रस्त्यांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले.
वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे वीजखांब मोडले असून वीज खात्याचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, येथील नारायण गावकर यांच्या घराच्या एका बाजूवर झाड पडल्याने त्यांच्या घराचेही नुकसान झाले. सुदैवाने या वादळात कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मात्र, शेती आणि बागायतींच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतित आहेत.