

पणजी : पुढारी वृत्तसेवा
म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात संध्याकाळच्या सुमारास वीजखंडित होण्यामागील प्रकरणाची अंतर्गत चौकशी आरोग्य सचिवांना करण्यास सांगून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
संबंधित सुमारे चार तासांच्या वीज खंडित घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. इस्पितळात असे प्रकार व्हायला नकोत. रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळेच वीजखंडित झाल्यानंतर तेथे पर्यायी व्यवस्था काय होती व ती वेळेत सुरू का होऊ शकली नाही व अंतर्गत त्रुटी शोधण्यास चौकशी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
रुग्णालयांसारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित जबाबदाऱ्या निश्चित करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
वाळपई येथे कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे पाय गमावलेल्या ११ वर्षीय मुलाला अत्याधुनिक रोबोटिक कृत्रिम पाय उपलब्ध करून देण्याचा पर्याय सरकार गांभीर्यान तपासत असल्याचे राणे यांनी सांगितले.