

सांगे : पुढारी वृत्तसेवा
समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने सांगेचे उपनगराध्यक्ष व संगमपूर शिवसाम्राज्य समितीचे अध्यक्ष संगमेश्वर नाईक यांच्या नेतृत्वाखालील समितीने घेतलेल्या कष्टाचे चीज होताना दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ ३० फूट उंचीच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. दि. १८ ते २० फेब्रुवारी असे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून विविध कार्यक्रम सुरू होतील.
या कार्यक्रमासाठी जवळपास ६ हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे संगमेश्वर नाईक यांनी सांगितले. सायं. ६.३० वा. संगीतमय शिवराज्यगाथा कार्यक्रम होईल. १९ रोजी सायं. ५०० दुचाकीस्वारांची दुचाकी मिरवणूक काकोडा ते सांगे दरम्यान निघेल. ६०० सुवासिनी कलश शोभायात्रा काढतील.
नंतर शिवाजी महाराजांच्या ३० फूट सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण होईल. स्मारकाजवळच सरकारी केंद्र शाळेच्या प्रांगणात शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून दाखवणारे चित्र प्रदर्शनही यावेळी होणार आहे.
हे शिवतीर्थ गोव्याच्या लौकिकात नक्कीच भर घालेल, असा विश्वास संगमेश्वर नाईक यांनी व्यक्त केला. सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी उपस्थित असतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यासह मंत्री दिगंबर कामत, मंत्री रोहन खंवटे, मंत्री रमेश तवडकर, सांगे पालिका मंडळाची उपस्थिती असेल.
संगमपूर शिवसाम्राज्य समिती ही संस्था निमंत्रक असून त्याचे अध्यक्ष संगमेश्वर पा. नाईक आहेत. सचिव सुप्रज श. ना. तारी, खजिनदार संजय रायकर, उपाध्यक्ष सत्यवान अ. नाईक, उपसचिव दिनेश भंडारी, उपखजिनदार निखिल नाईक तारी, सदस्य कार्यक्रमासाठी झटत आहेत.