

पेडणे : निवृत्ती शिरोडकर
पोकेवाडा-मोरजी येथील बाबा पोके यांच्या गणपती चित्रशाळेने सुमारे दीडशे वर्षांपासून जपलेली चिकणमातीच्या गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा आज तिसऱ्या पिढीतही सुरू आहे. पारंपरिक मूर्ती कलेला पोर्तुगालमध्येही पसंती असल्याचे मूर्तिकार उमाकांत पोके यांनी सांगितले. पोके यांनी गणेशमूर्तींसह विविध शिल्पे व पुतळे साकारण्यातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, भगवान परशुराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह २१ फूट उंच स्वामी समर्थांचा पुतळा त्यांनी साकारला आहे. दरम्यान, पीओपी मूर्तींवर बंदी असतानाही त्या विकल्या जातात, त्यामुळे पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी भक्तांनी चिकणमातीच्या मूर्तींनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन उमाकांत पोके यांनी केले. चिकणमातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी टाळण्यास मदत होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या वाढत्या वापराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
वर्षभर कलेची साधना करणाऱ्या पारंपरिक मूर्तिकारांसमोर गणेशोत्सवाच्या काळात केवळ व्यवसायासाठी पीओपीच्या मूर्ती विकणाऱ्यांमुळे आव्हान निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात पीओपीच्या गणेशमूर्तींवर निर्बंध घालावेत, अशी मागणी पेडणे तालुक्यातील मूर्तिकारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष तथा पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सरकार या मागणीचा सकारात्मक विचार करेल, असा विश्वास पोके यांनी व्यक्त केला. पूर्वी चोपडे-शिवोली पूल नसताना गुडे, शिवोली व परिसरातील गणेशभक्त होडीतून मोरजीत येऊन पोके यांच्या चित्रशाळेतून मूर्ती घेऊन जात असत.
या जुन्या आठवणी आजही उमाकांत पोके अभिमानाने सांगतात. आजोबा बाबा पोके, वडील व काकांकडून मूर्तिकलेचे धडे घेतल्यानंतर उमाकांत यांनी मुंबईत सतीश वलीवाडकर यांच्याकडून मोठ्या आकाराच्या मूर्ती घडविण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले.
पोर्तुगालकडील सहा दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांनी तिथल्या कलाकारांना चिकणमातीपासून मूर्ती व शिल्पे घडविण्याचे प्रशिक्षण दिले. कला आणि संस्कृती खात्याचा 'युवा सृजन पुरस्कार'ही त्यांना प्राप्त झाला आहे.