

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कुठ्ठाळ्ळी येथील झुआरी पुलाखाली २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर आगशी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.
आगशी पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी सांगितले की, या प्रकरणात २५ वर्षीय मॅकविन पिएदाद आंद्राद (रा. नुवे) आणि २१ वर्षीय रोवन जोस अब्रांचिस (रा. वेर्णा) यांना अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पीडित तरुणी व संशयितांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी गोमेकॉ इस्पितळातील डॉक्टरांकडे अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी शंख गोळा करण्यासाठी शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर गेली होती.
तेथे तिची दोन्ही संशयितांशी ओळख झाली. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आणि मद्यसेवन केल्यानंतर, तरुणी स्वतः दुचाकी चालवण्याच्या स्थितीत नसल्याने ती संशयितांपैकी एकाच्या दुचाकीवर बसली, तर दुसऱ्या आरोपीने तिची दुचाकी चालवली.
त्यानंतर तिघेही कुठ्ठाळ्ळी येथे गेले आणि तेथे एका दारू दुकानातून दारू घेतली. त्यानंतर ते झुआरी पुलाखाली गेले. तिथे संशयितांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीने आगशी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या माहितीनुसार, ती मद्याच्या प्रभावाखाली असताना हा प्रकार घडला.