

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पाच वर्षांत गोव्यात ६४३ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यापैकी २७२ जणांनी हेल्मेट घातले नव्हते. तर ३७१ जणांनी (५७टक्के) हेल्मेट परिधान केले असतानाही जोरदार धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गोवा पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांपैकी ५७टक्क्यांहून अधिक जणांनी अपघाताच्या वेळी हेल्मेट घातले होते.
तरीही अपघातातील धक्क्याची तीव्रता इतकी होती की, त्यातून त्यांचा जीव वाचू शकला नाही. हेल्मेट वापरणे आवश्यक असतानाही राज्यात हेल्मेट न वापरणे हे वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन ठरत आहे. केवळ २०२५ वर्षातच पोलिसांनी २,१८,०११ वाहतूक नियमभंग प्रकरणे नोंदवली, त्यापैकी ५४,०९६ प्रकरणे म्हणजे सुमारे २५ टक्के प्रकरणे हेल्मेट न घालण्याशी संबंधित होती.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, अनेक प्राणघातक अपघातांमध्ये दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होतात. डोक्यावरील आघातांव्यतिरिक्त इतरही घटक अपघातांच्या तीव्रतेस कारणीभूत ठरतात. अतिवेग, मद्यपान करून वाहन चालवणे आणि मोबाईल फोनचा वापर ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहतूक नियम पालक करण्याकडे दुर्लक्षच
रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याबरोबरच अपघातप्रवण क्षेत्रांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी पोलिसांनी नागरी संस्थांकडे विविध प्रस्ताव सादर केले आहेत. रस्त्यांवर आवश्यक भौतिक सुधारणा, गतीरोधकांची वाढ तसेच अपघातप्रवण क्षेत्रे कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन करण्यात होणारी कुचराई हीच अपघातांची मुख्य कारणे ठरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.