

पणजी : पुढारी वृत्तसेवा
५० जिल्हा पंचायतीच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण २२६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण ९४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यात उत्तर गोव्यातून ४७ व दक्षिण गोव्यातील ४७ उमेदवारांचा समावेश आहे.
उत्तर गोव्यातील २५ जागांसाठी १११ उमेदवार रिंगणात असून दक्षिण गोव्यातून २५ जागांसाठी ११५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व मगो युती, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युती, स्वबळावर लढणारे आम आदमी पक्ष व रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) अशी चौरंगी लढत होणार आहे.
दक्षिण गोव्यात दोन जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काही मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. सांकवाळमध्ये सर्वाधिक ८ उमेदवार : राज्यात सर्वात जास्त उमेदवार सांकवाळ जि. पं. मतदारसंघात सर्वातजास्त ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर धारगळ, धारबांदोडा, पैंगिण या मतदारसंघात प्रत्येकी ७उमेदवार रिंगणात आहेत. खोर्ली, शिवोली व हळदोण्यात प्रत्येकी ६ उमेदवार रिंगणार आहेत.