

मयुरेश वाटवे
पणजी : राज्यात झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुका अपेक्षेप्रमाणे भाजपने जिंकल्या आहेत. उत्तर गोव्यात निर्विवाद वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपला तसेच यश दक्षिणेत मिळवता न आल्याने विरोधकांना थोडा आशेचा किरण दिसत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, निवडणूक निकालाचे तपशीलवार विश्लेषण केले असता भाजपला मिळालेले यश हे राज्यव्यापी आहे, तर काँग्रेसला मिळालेले यश केवळ सासष्टीपुरते मर्यादित आहे. आरजीने तिसवाडीतील दोन जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजप व मित्र पक्षांनी 12 पैकी 11 तालुक्यांत वर्चस्व राखले आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालातून विरोधकांनी हुरळून जावे, असे काहीच नाही. काँग्रेस असो किंवा आप, गोवा फॉरवर्ड हे केवळ सासष्टीतच वरचढ ठरले आहेत. एका वर्षावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणूक निकालांनी खरे तर विरोधकांचेच धाबे दणाणलेले आहे.
भारतीय जनता पार्टीने उत्तर गोव्यात पूर्णत: आपले वर्चस्व या जिल्हा पंचायत निवडणुकीत दाखवले आहे. 25 मतदारसंघांपैकी फक्त भाजपला 18 व भाजप मगो युतीला 19 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे दोन तृतीयांश बहुमत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपला मिळालेले आहे. गमावलेल्या मतदारसंघांपैकी शिरसई, कोलवाळ, सांताक्रूज हे मतदारसंघ भाजप आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात येतात. हरमल हा मगोच्या मांद्रे मतदारसंघात येतो. सेंट लॉरेन्स हा मतदारसंघ सांत आंद्रे या आरजीच्या मतदारसंघात येतो, तर हळदोणा मतदारसंघ काँग्रेसच्या कार्लुस फेरेरा यांच्या मतदारसंघात येतो. थिवीचे दोन आणि सांताक्रूजमधील एक मतदारसंघ वगळता एकाही भाजपच्या मंत्री किंवा आमदाराला अपयशाचे तोंड पाहावे लागलेले नाही. उत्तर गोव्यातील भाजपच्या 18 पैकी 8 मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांची विजयी आघाडी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या एकत्रित मतांहूनही अधिक आहे. जिथे दोनहून अधिक उमेदवार आहेत, तेथील ही आघाडी आहे. होंडा, केरी, पाळी, ताळगाव या आणखी चार ठिकाणी झालेल्या थेट लढतीत भाजपच्या विजयी उमेदवारांच्या जवळपास एक दशांश मते विरोधकांना मिळालेली आहेत.
दक्षिण गोव्यातही भाजपला 11 जागा मिळालेल्या आहेत. तिथे मगो 2 व अपक्ष 1 यांच्यासह युतीने मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. गोवा फॉरवर्ड व आम आदमी पक्षाला दक्षिण गोव्यात प्रत्येकी एकच जागा मिळालेली आहे. दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघात काँग्रेसला 8 जागा मिळाल्याने त्यांनी भाजपला चांगली टक्कर दिल्याचे चित्र दिसत असले, तरी यापैकी 7 जागा केवळ सासष्टीतच मिळालेल्या आहेत. तिथे उल्हास तुयेकर यांच्या मतदारसंघात येणाऱ्या दवर्ली व नावेली मतदारसंघाचा अपवाद वगळता भाजपशी थेट लढतच झालेली नाही. आठवी जागा त्यांना काणकोणमधील खोलामध्ये मिळाली आहे.
नुवेत भाजपचा आमदार असला तरी या मतदारसंघात भाजपने जिल्हा पंचायतीत उमेदवारच दिलेला नव्हता. हा मतदारसंघ कधीही भाजपकडे नव्हता. भाजपचे आमदार असलेल्या सावर्डे (धारबांदोडा, सावर्डे), सांगे (रिवण), कुडचडे (शेल्डे), शिरोडा (बोरी, शिरोडा), फोंडा (कुर्टी) या ठिकाणी पक्षाला 100 टक्के यश मिळाले आहे. काणकोणमध्ये पैंगीण भाजपकडे आला, तर खोला काँग्रेसकडे गेला आहे. उलट काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता यांच्या मतदारसंघातील बार्से मतदारसंघावर भाजपने विजय मिळवला आहे. युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्ता यांच्या मतदारसंघातील थोडा थोडा भाग येणाऱ्या गिरदोली मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडला असला तरी तो भाजपचा बंडखोर उमेदवार (संजय वेळीप) आहे. त्याचे श्रेय या दोघांना किती जाते, हेही बघावे लागेल.त्यामुळे दक्षिण गोव्यात भाजपसाठी येणारा काळ कसोटीचा आहे असे चित्र निर्माण केले गेले असले तरी सासष्टी पलीकडे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आपलाही यश मिळालेले नाही, हीच वस्तुस्थिती आहे.दक्षिण गोवा मतदारसंघातील भाजपने जिंकलेल्या 11 मतदारसंघांपैकी 4 ठिकाणी भाजपच्या उमेदवारांची विजयी आघाडी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या एकत्रित मतांहून अधिक आहे.
भाजप-मगोप-अपक्ष युतीचे 12 पैकी 11 तालुक्यांत वर्चस्व
जिल्हा पंचायत निवडणुकीत 12 पैकी सत्तरी (3 पैकी 3), डिचोली (4 पैकी 4), धारबांदोडा (2 पैकी 2), सांगे (1पैकी 1), मुरगाव (2 पैकी 2), केपे (2 पैकी 2) अशा एकूण सहा तालुक्यांत भाजप व मित्र पक्षांनी 100 टक्के वर्चस्व राखले आहे. फोंडा (7 पैकी 6), बार्देश (9 पैकी 6), पेडणे (4 पैकी 3) या तीन तालुक्यांत 80 टक्क्यांहून अधिक यश मिळवले आहे. तर तिसवाडी (5 पैकी 3 ), काणकोण (2 पैकी 1) या दोन तालुक्यांत 50 टक्के किंवा अधिक यश मिळवले आहे. सासष्टी असा एकच तालुका आहे जिथे भाजप अपक्ष युतीतील भागीदारांना (9 पैकी 0) एकही जागा मिळालेली नाही. पैकी या तालुक्यात भाजपने दोनच जागा लढवून गमावल्या.
भाजपमध्ये यांच्यासाठी चिंतेचा विषय
थिवीचे आमदार, मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, प्रियोळचे आमदार आणि माजी मंत्री गोविंद गावडे, नावेलीचे आमदार उल्हास नाईक तुयेकर.
यशाचे श्रेय मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांना
उत्तर व दक्षिण अशा दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचे सत्ता मिळवली आहे. प्रत्येक मंत्री आमदाराने उमेदवारांच्या विजयासाठी बरेच कष्ट उपसलेले दिसले. त्यांना मिळालेला कार्यकर्त्यांचा पाठिंबाही महत्त्वाचा आहे. मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिवसरात्र एक करत उमेदवारांचा प्रचार केला. या यशाचे श्रेय त्यांच्या नेतृत्वालाच जाते. मुख्यमंत्र्यांनी म्हजें घर योजनेचा प्रचारही या निवडणुकीत चांगल्या प्रकारे केला. त्याचाही बराच प्रभाव मतदारांवर पडला.