

साळ : पुढारी वृत्तसेवा
श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय गोवा ची ८० वारकऱ्यांची तुकडी आज दिनांक २० डिसेंबर रोजी सायंकाळी स्वच्छता करण्याकरता पंढरपुरास रवाना झाली आहे. फोंड्याहून एक बस तर मेणकुरे येथून दुसरी बस अशा दोन बसमधून सुमारे ८० वारकऱ्यांच्या तुकडीला यंदाचे देवस्थानचे पलटदार पंढरीनाथ दिगंबर नाईक यांनी हिरवा बावटा दाखविला.
याप्रसंगी मेणकुरे येथील श्री माऊली देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव अंकुश नाईक हेही उपस्थित होते. दरम्यान, यावेळी पंढरीनाथ म्हणाले की 'लाखो भाविक ज्या स्थळाला भेट देतात तेथे स्वच्छता राखावी परिसर नितळ असावा असे सर्वांना वाटते.
मात्र ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय गोवा हा परिसर स्वच्छ करण्याची व्रत सुमारे १२ वर्षे जपत आहे म्हणून ही संस्था कौतुकास पात्र आहे आणि त्या संस्थेचे वारकरी वंदनीय आहेत 'शेवटी त्यांनी बसच्या समोर नारळ वाढवून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष देवानंद नाईक, खजिनदार मुकुंद लामगावकर, नकूळ नाईक, शंभू नाईक, मिलिंद नाईक, नरेश दातये, गणेश शिरोडकर, महेश शिरगावकर, नंदकुमार शेट्ये, विष्णू धारगळकर तसेच फोंडा वारकरी तर्फे श्री प्रकाश रामनाथकर व नागेश नाईक आणि श्री माऊली अंजनी हळर्णकर आदी उपस्थित होते.