अनिल पाटील
पणजी: राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांसह विविध सरकारी अनुदान आणि नुकसान भरपाई मिळणाऱ्या लाभार्थींना हे सर्व पैसे चतुर्थीपूर्वी मिळतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. आज बुधवारी रोजी मंत्रालयात त्यांनी अर्थ खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठकी घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी अर्थ खात्याचे प्रधान सचिव कंडावेल्लू आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जसे की, गृहआधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना यांचे पैसे चतुर्थीपूर्वी म्हणजे ७ सप्टेंबरपूर्वी लोकांना मिळावेत. याबरोबर शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान, नुकसान भरपाई हे पैसेही त्वरित मिळावेत यासाठी अर्थ खात्याला विशेष सूचना केल्या आहेत. आणि या संदर्भातले सर्व आर्थिक व्यवहार तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी हे सर्व पैसे संबंधितांच्या खात्यावर जमा होतील. असेही ते म्हणाले.