

वास्को : झुआरीनगर, सांकवाळ येथील भंगारअड्डे 12 दिवसांत दुसऱ्यांदा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. मात्र, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आजूबाजूला असलेले सुमारे 20-22 भंगारअड्ड्यांना आगीपासून वाचविण्यात यश मिळाले.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारी 30 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास झुआरीनगर भागात असलेल्या भंगारअड्ड्याला आग लागल्याची माहिती वास्को अग्निशामक दलाला मिळाली. आगीने भीषण रूप धारण केल्याचे समजताच वेर्णा, मडगाव, फोंडा, पणजी, एमपीटी आणि शिपयार्डच्या अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले. यानंतर साहाय्यक विभागीय अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सध्या जेसीबी मागवण्यात आले असून, येथील जळालेले साहित्य बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
झुआरीनगरमधील या भागात तब्बल 20-22 भंगारअड्डे आहेत. त्यातील एकाला आग लागली होती. इतर अड्डे पूर्णतः सुरक्षित आहेत. 19 नोव्हेंबर रोजी देखील असाच काहीसा प्रकार घडला. त्यावेळी देखील तत्परता दाखवून अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणली व कोट्यवधींची मालमत्ता भस्मसात होण्यापासून वाचवली होती. सध्या आग भडकण्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. याबाबत सखोल तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले.