

पाटण : पाचगणी, ता. पाटण येथे शुक्रवार दि. 28 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास श्रीमती रंजना ईश्वर सुर्वे यांच्या राहत्या घरास अचानक आग लागली. या आगीत अन्नधान्य, कपडे, कागदपत्रे, सोन्याचे दागिने, किरकोळ वस्तू तसेच 30 हजार रोख रुपये जळून नुकसान झाले आहे. आगीत घराच्या केवळ भिंतीच शिल्लक राहिल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत 4 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोरगिरी विभागातील दुर्गम ठिकाणी वसलेल्या पाचगणी येथे रंजना सुर्वे यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुर्वे यांच्या घराला अचानक आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीत अन्नधान्य, कपडे, कागदपत्रे, सोन्याच्या वस्तू, किरकोळ वस्तू तसेच 30 हजार रोख रुपये जळून नुकसान झाले आहे.
या आगीचा पंचनामा गावकामगार तलाठी पाचगणी व सर्कल मोरगिरी यांनी जागेवर जाऊन केला आहे. आगीत श्रीमती सुर्वे यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याप्रसंगी मोरगिरी विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, सरपंच सुरेश शेंडे, माजी सरपंच आनंदा सुरवे, बंडू सुरवे, आत्माराम सुरवे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर आग अचानक कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.