

पणजी : गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्या पॅनेलने अभाविप विद्यार्थी संघटनेवर मात करत विजय मिळवला. एकूण 98 विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी मतदान करणार होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानासाठी 95 प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी एनएसयूआय - गोवा फॉरवर्ड पॅनेलला 50 तर अभाविपला 45 मते मिळाली. 9 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये 8 जागा एनएसयूआयने जिंकल्या, तर 1 जागा अभाविपकडे राहिली.
याबाबत एनएसयूआय गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी म्हणाले की, नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीपूर्वी आचारसंहितेचे कारण देत निवडणूक अचानकपणे पुढे ढकलण्यात आली. मात्र जर विजयी झालो असतो तर त्याचा थेट परिणाम जिल्हा पंचायत निकालावर होऊन भाजपला कमी मते मिळाली असती. यासाठी भाजप आमदारांनी विद्यार्थ्यांना धमकावण्याचेही प्रकार केले. मात्र तरीही आम्ही डगमगलो नाही. त्यामुळेच आज आम्ही विजयी झालो.
विद्यार्थी मंडळाची ही निवडणूक 16 डिसेंबरला पार पडणार होती. मात्र अचानकपणे काही मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांना निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी एनएसयुआय आणि अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले. मंगळवारी पार पडलेल्या निवडणुकीत राज्यस्तरीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी साई देसाई यांची एकमताने निवड झाली आहे. अभाविपने या निवडणुकीत विजयाचा दावा केला होता. मात्र गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसच्या युतीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.
संयुक्त आघाडीने केला विद्यार्थी परिषदेचा पराभव : पणजीकर
पणजी : गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीत एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्ड विद्यार्थी विभाग यांच्या संयुक्त आघाडीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला. त्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी एनएसयूआय आणि गोवा फॉरवर्ड विद्यार्थी विभाग यांचे अभिनंदन केले. पणजीकर म्हणाले, लोकशाहीवादी शक्ती एकत्र आल्या, तर काहीही अशक्य नाही, हे या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.