

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. भरतियार विद्यापीठ, कोईम्बतूर येथील गणित विभागाचे प्रा. एस. सरवनन यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा कार्यकाल 6 ऑक्टोबरला संपला. कार्यकाल संपण्यापूर्वी नूतन कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित होते. परंतु, कुलगुरू निवड समिती तीन सदस्यांपैकी एकाच सदस्याची निवड करण्यात आली. तत्कालीन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले. त्यानंतर गुजरात राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार दिला आहे. नुकत्याच झालेल्या अधिसभेत सदस्यांनी पूर्ण वेळ कुलगुरू नसल्याबाबत जोरदार निदर्शने केली. याची तत्काळ दखल घेत राज्यपाल कार्यालयाने कुलगुरू शोध निवड प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू केली.
कुलगुरुपदासाठी आवश्यक असलेली आवश्यक पात्रता आणि अनुभव इत्यादी विद्यापीठाच्या वेबसाईटwww.unishivaji.ac. in वर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी वेबसाईटवरील नमुन्यात (जास्तीत जास्त 50 पानांपर्यंत) बायोडेटा सादर करणे गरजेचे आहे. संस्था, सहकर्मीही योग्य उमेदवारांना नामांकित करू शकतात. नामांकने, अर्ज 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा नोडल ऑफिसर यांच्याकडे पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.