

Goa Higher Education
पणजी: गोवा विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करत राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) कडून ’ए प्लस ’ प्राप्त केला आहे. सेव्हन स्केल गुणमापन पद्धतीत गोवा विद्यापीठाला ३.३ अशी सीजीपीए मिळाली असून, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
ही मान्यता विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, प्रशासनिक पारदर्शकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित आहे. नॅक हे भारत सरकारच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्थान आहे, जे देशभरातील विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे गुणवत्ता मूल्यांकन करते.
गोवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. हरिलाल मेनन यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले, ही मान्यता म्हणजे आमच्या संपूर्ण विद्यापीठ समुदायाच्या कठोर परिश्रमांची पावती आहे. आम्ही शैक्षणिक उत्कृष्टतेच्या दिशेने काम करत राहू.
विद्यापीठाने मागील काही वर्षांत संशोधन, नवोन्मेष, डिजिटल शिक्षण, आणि विद्यार्थी कल्याणासाठी अनेक नवे उपक्रम राबवले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम या मानांकनात दिसून आला आहे. राज्यातील इतर शैक्षणिक संस्थांसाठी गोवा विद्यापीठाचे हे यश प्रेरणादायी ठरणार आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही विद्यापीठाचे अभिनंदन करत म्हटले, गोवा विद्यापीठाचा ए प्लस ग्रेड ही संपूर्ण राज्यासाठी गौरवाची बाब आहे. हे यश गोव्यातील उच्च शिक्षणाच्या दर्जाचा आणि विकासाचा प्रतिक आहे.