

पणजी : राज्यातील स्थानिक टॅक्सीचालकांना डिजिटल पायाभूत सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी गोवा सरकारने ‘गोवा टॅक्सी ड्रायव्हर अॅप’ सुरू केले आहे. यामध्ये सहभागी होणार्या आणि ठराविक अटी पूर्ण करणार्या टॅक्सीचालकांना सरकारकडून मोफत इंधनाचा लाभ मिळणार आहे.
या योजनेंतर्गत, जे चालक अॅपद्वारे 50 प्रवास पूर्ण करतील आणि पहिल्या 500 सहभागींपैकी असतील, त्यांना 25 लिटर मोफत इंधन (पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी) प्रदान केले जाईल. हा उपक्रम टॅक्सी चालकांना आर्थिकद़ृष्ट्या मदत करण्याबरोबरच अॅपवर सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहन देतो. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक टॅक्सी सेवेला प्रोत्साहन देणे, प्रवाशांना अधिक सुरक्षित व विश्वसनीय सेवा देणे आणि डिजिटल माध्यमांतून टॅक्सी बुकिंग सुलभ करणे हा आहे. याशिवाय, अॅपमुळे प्रवाशांना पारदर्शक दर आणि ट्रॅकिंगसारख्या सुविधा मिळणार आहे.
या अॅपच्या माध्यमातून स्थानिक टॅक्सीचालकांना ओला-उबेरसारख्या मोठ्या अॅप्सशी स्पर्धा करता येणार असून, त्यांच्या व्यवसायात थेट वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी चालकांनी कमीतकमी 50 प्रवास अॅपद्वारे पूर्ण केलेले असावेत. हे प्रवास 30 दिवसांच्या कालावधीतच पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. चालकाने दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत अॅपवर सक्रिय राहणे बंधनकारक आहे. लाभ मिळवण्यासाठी चालकाचे खाते अॅपमध्ये सत्यापित असणे आवश्यक आहे.