

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा शहर व ग्रामीण नियोजन (टीसीपी) मंडळाने राज्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील १,०२,१५,९५४ चौरस मीटर (सुमारे १.०२ कोटी चौरस मीटर) क्षेत्र 'नो डेव्हलपमेंट झोन' (एनडीझेड) म्हणून अधिसूचित केले आहे.
या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रांमध्ये नवीन बांधकामे आणि विकास प्रकल्पांवर निर्बंध लागू होणार असून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जाणार आहे. ही अधिसूचना सासष्टी, केपे आणि धारबांदोडा तालुक्यांतील विविध गावांमधील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जमिनींना लागू करण्यात आली आहे. या क्षेत्रांमध्ये जैवविविधता, जलस्रोत, वनसंपदा आणि नैसर्गिक परिसंस्थांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिसूचनेनुसार सर्वाधिक क्षेत्र कुंकळ्ळी येथे असून, ते ४०,८९,८०० चौरस मीटर आहे. त्यानंतर देऊस्सा येथे १६,७३,५३० चौरस मीटर, कावरे येथे १५,७१,५७२ चौरस मीटर, चांदोर येथे ९,५०,१८८ चौरस मीटर, दवर्ली येथे ९,३१,४८३ चौरस मीटर, वेरोडा येथे ८,१९,३७१ चौरस मीटर, पिळये येथे १,४६,४५१ चौरस मीटर, देआओ येथे २९,९२२ चौरस मीटर, शेळबे येथे १०,५१२ चौरस मीटर आणि शिरवई येथे १,१२५ चौरस मीटर क्षेत्राचा समावेश आहे.