

हणजूण : हणजूण पंचायत क्षेत्रात आता मोकाट गुरांवर निर्बंध येणार असून भटक्या गुरांवर नियंत्रण आणण्यासाठी हणजूण कायसुव पंचायतीने गो शाळेबरोबर करार केला आहे, अशी माहिती हणजूण कायसुव पंचायतीचे सरपंच सुरेंद्र गोवेकर यांनी दिली.
सरपंच सुरेंद्र गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायतीने गोमंतक गोसेवक महासंघ, डिचोली यांच्यासोबत करार केला असून पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थ व शेतकरी तसेच गुरे, जनावरांच्या मालकांना 27 नोव्हेंबर रोजी एक जाहीर नोटीस बजावून इशारा दिला आहे. सोमवार एक डिसेंबरनंतर पंचायत क्षेत्रातील रस्त्यावर बेकायदेशीर गुरे फिरताना आढळल्यास ती सदर गो शाळेकडून उचलली जातील. उचलण्यात आलेली गुरे गोशाळेतून परत आणायची असल्यास त्यांचा गुरे उचलून नेण्याचा खर्च व जनावरांचा खाण्याचा खर्च जमा करून ती गुरे परत आणावी लागतील. दुसऱ्यांदा पुन्हा गुरे अशीच रस्त्यावर फिरताना आढळल्यास व ती पुन्हा उचलून नेल्यास होणाऱ्या खर्चाबरोबर दंडही भरावा लागेल, असे सरपंच सुरेंद्र गोवेकर यांनी सांगितले.