

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात ४० स्वयंसहाय्य गटांनी (सेल्फ हेल्प ग्रुप) सुमारे ३८० कोटी रुपयांची उलाढाल साध्य केली आहे. जी राज्यातील महिला सक्षमीकरणातील मजबूत प्रगती दर्शवते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कांपाल पणजी येथे शुक्रवारपासून आयोजित गोवा ग्रामीण अन्न महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले की, जिल्हा ग्रामीण विकास विभागांतर्गत काम करणाऱ्या या ४० बचत गटांमध्ये सुमारे ४९ हजार महिला आहेत. ग्रामीण विकास खाते (डीआरडीए) या महिलांना सक्षम बनवण्यात आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अनेक महिला कलाकृती, हस्तकला आणि काथ्या-आधारित कामांमध्ये गुंतल्या आहेत आणि नवीन उत्पादने तयार करत आहेत. सरकार त्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी एक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून देते, असे सांगून अनेक महिलांना पुर्वी संघर्ष करावा लागत होता, आता त्याचा कारभार सुरळीत झाल्याचे डॉ. सावंत म्हणाले. यावेळी कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.