

पणजी : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण संचालनालयाने शैक्षणिक वर्ष २०२६२७ साठी इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीकरिता शैक्षणिक सत्र, सुट्ट्या व परीक्षा यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. जाहीर वेळापत्रकानुसार, पहिले सत्र १ एप्रिल २०२६ (बुधवार) पासून १० ऑक्टोबर २०२६ (शनिवार) पर्यंत राहील.
त्यानंतर दुसरे सत्र १२ ऑक्टोबर २०२६ (सोमवार) पासून २४ मार्च २०२७ (बुधवार) पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध सण व सुट्ट्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. गणेश चतुर्थीची सुट्टी १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६, दिवाळी सुट्टी २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६, तर नाताळ सुट्टी २४ डिसेंबर २०२६ ते २ जानेवारी २०२७ अशी असेल.
तर उन्हाळी सुट्टी १ मे २०२७ ते ५ जून २०२७ या कालावधीत राहणार आहे. T शाळांना एकूण १० ऐच्छिक (डिस्क्रेशनरी) सुट्ट्या जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला असून, त्यापैकी ४ सुट्ट्या १६ ते १९ सप्टेंबर २०२६ दरम्यान गणेशोत्सवानिमित्त देणे बंधनकारक असेल.
उर्वरित सुट्ट्या पालक-शिक्षक संघटना व शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने जाहीर केल्या जातील. याशिवाय शाळेच्या अध्यापनाचे तास दररोज ५ तास ३० मिनिटांपेक्षा कमी नसावेत. दरम्यान, इयत्ता पहिली ते पाचवी आणि अकरावीच्या शाळा ६ जून २०२६ रोजी सुरू होतील, मात्र त्यांच्यासाठीही सत्र व सुट्ट्यांचे वेळापत्रक इयत्ता सहावी ते दहावी व बारावीप्रमाणेच लागू राहील, असे शिक्षण संचालक शैलेश आर. सिनई झिंगडे यांनी स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक तासांचे वेळापत्रक
शैक्षणिक वर्षात किमान २२० कार्यदिवस आणि २०० अध्यापन दिवस असणे आवश्यक असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पहिली सत्र परीक्षा तर दुसरी सत्र परीक्षा १३ मार्च २०२७ पर्यंत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंतिम निकाल ३१ मार्च २०२७ पूर्वी जाहीर करता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.