

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यात यंदा झेंडू फुलांच्या लागवडीला शेतकरी बांधवांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, तालुक्याच्या विविध भागांत जवळपास २५ हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड करण्यात आली होती. या लागवडीतून सुमारे २० टन झेंडू फुलांचे उत्पादन मिळाले आहे. मात्र, अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत यंदा जवळपास ४० टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्यंतरी पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्यामुळे निर्माण झालेल्या कोरड्या परिस्थितीचा झेंडूच्या झाडांच्या वाढीवर तसेच फुलांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला, असे स्पष्टीकरण वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ ग्रामसे यांनी दिले.
दरम्यान, उत्पादनात घट झाली असली तरी सत्तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक झेंडू फुलांचे उत्पादन झाल्यामुळे वाळपई शहराच्या बाजारपेठेवर त्याचा कोणताही मोठा विपरीत परिणाम जाणवला नाही. विशेष म्हणजे, अनेक गावांमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या फुलांची विक्री त्याच गावांमध्ये आणि स्थानिक पातळीवर करण्यात आली. त्यामुळे वाहतूक व मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होऊन अनेक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा झाला. स्थानिक ग्राहकांनाही ताजी फुले उपलब्ध झाली, असे ग्रामसे यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून कृषी खात्यामार्फत आत्मा योजनेच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यात झेंडू फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सत्तरी तालुक्यातील जमीन आणि हवामान झेंडू लागवडीसाठी पोषक असल्यामुळे बागात झेंडूच्या फुलांचा आकार मोठा होण्याबरोबरच झाडांची वाढही चांगल्या प्रकारे होत असते. त्यामुळे या पिकाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी कृषी खात्याकडून सातत्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहन केले जात आहे.
यंदा सुमारे २५ हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड करण्यात आली होती. वाळपई विभागीय कृषी कार्यालयामार्फत जवळपास १ लाख २० हजार झेंडूच्या रोपट्यांचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील अनेक प्रमुख शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या लागवडीत सहभाग घेतला. त्याचप्रमाणे महिला स्वयंसेवी गट, महिला मंडळे आणि पाणीवाटप संस्थांनीही झेंडू लागवडीवर विशेष भर दिला. त्यामुळे यंदा झेंडू लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली.
सर्वसाधारणपणे एका झेंडूच्या झाडापासून सरासरी तीन किलोपर्यंत फुलांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा असते. या हिशेबाने १ लाख २० हजार झाडांमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता होती. अनुकूल हवामान आणि पुरेसा पाऊस लाभला असता तर यंदा झेंडू फुलांचे उत्पादन ३५ टनांपेक्षा अधिक झाले असते, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, मध्यंतरी पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्यामुळे अनेक भागांत कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाण्याअभावी झेंडूच्या झाडांची अपेक्षित वाढ होऊ शकली नाही. त्याचा थेट परिणाम फुलांच्या संख्येवर आणि उत्पादनावर झाला. परिणामी, अपेक्षित उत्पादनाऐवजी प्रत्यक्षात जवळपास २० टन फुलांचे उत्पादन मिळाले.
यंदा अनेक शेतकऱ्यांनी प्रथमच झेंडू फुलांची व्यावसायिक स्वरूपात लागवड केली होती. त्यांनाही या पिकातून चांगला आर्थिक लाभ मिळाला आहे. सरासरी १०० ते १२० रुपये दराने झेंडू फुलांची विक्री करण्यात आली. सणासुदीच्या काळात फुलांना असलेल्या मागणीमुळे उत्पादकांना आपल्या मालाची विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली.
वाळपई शहराच्या बाजारपेठेत यंदा स्थानिक झेंडू फुले मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दिसली नाहीत. काही उत्पादकांनी एजंटांमार्फत मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री केली, तर काहींनी आपल्या शेतात किंवा गावातच ग्राहकांना थेट फुले विकण्यावर भर दिला. यामागील कारण स्पष्ट करताना ग्रामसे यांनी सांगितले की, अनेक उत्पादकांनी एजंटांच्या माध्यमातून फुलांची विक्री केली, तर काहींनी उत्पादित केलेली फुले गावातच विकण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे स्थानिक पातळीवरच फुलांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा झाला. या उपक्रमाचा उद्देश केवळ स्थानिक फुलांचे उत्पादन वाढविणे एवढाच नसून, परराज्यांतून गोव्यात मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या झेंडू फुलांवरील अवलंबित्व कमी करणे आणि स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन वाढल्यास फुलांच्या विक्रीतून मिळणारा आर्थिक लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो.
झेंडू लागवडीसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता नसून, उपलब्ध जमिनीचा योग्य वापर करूनही या पिकाची लागवड करता येते. महिला बचत गट, महिला मंडळे आणि शेतकरी गटांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभागी झाल्यास स्थानिक पातळीवर फुलांचे उत्पादन आणि विक्री व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते.
पूरक व्यवसाय म्हणून चांगला पर्याय
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनात घट झाली असली तरी सत्तरी तालुक्यातील झेंडू लागवडीला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी या पिकाकडे केवळ सणासुदीपुरते मर्यादित न पाहता पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे.
स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य द्या
परराज्यांतून येणाऱ्या फुलांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनीही स्थानिक शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठ मिळाल्यास सत्तरी तालुक्यात झेंडू लागवडीचा विस्तार होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.
"गावातील नागरिकांनाही आपल्या परिसरातच ताजी फुले उपलब्ध झाली. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून सत्तरी तालुक्यात झेंडू फुलांच्या लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे."
— विश्वनाथ ग्रामसे, वाळपई विभागीय कृषी अधिकारी