

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
या गोव्याला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्षे उलटली असली, तरी सावर्डे मतदारसंघातील आंबेउदक सांतोणमधील या छोट्याशा गावाला रस्ता मिळवून देणे शासनाला अद्याप शक्य झाले नाही. आजही येथील ग्रामस्थ चिऱ्यांच्या खाणीमधील धोकादायक रस्त्याचा वापर करून घर गाठत आहेत. जिथे मूलभूत साधन सुविधा उपलब्ध नाहीत, तिथे निदान स्वच्छ हवा आणि प्रदूषण रहित वातावरणाचे ग्रामस्थ हकदार होते.
आता तेही त्यांच्याकडून हिरावले जाऊ लागले आहेत. एखाद्या औद्योगिक वसाहती प्रमाणे सांतोणच्या खासगी जमिनीत मोठ्या प्रमाणावर अवैध कारखाने सुरू झाले आहेत. या प्रदूषणकारी कारखान्यांमुळे स्वतःच्याच गावात रहिवाशांचा श्वास कोंडला जात असून घरातील पाणी सुद्धा प्रकल्पांच्या भुकटीमुळे काळे पडू लागल्याने संपूर्ण गाव भीतीच्या छायेखाली आलेला आहे.
सावर्डे पंचायत क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धारबांदोडा तालुक्यातील सांतोण हे गाव सांगेच्या महसूल क्षेत्राखाली येते. या गावाच्या सीमा रचनेबाबत गुंतागुंत असल्यामुळे त्याचा फायदा बेकायदेशीरपणे प्रकल्प चालवणारे व्यवसायिक घेत आहेत. पंचायतीकडून तात्पुरता परवाना घेऊन प्रकल्प सुरू केले जात असल्याच्या प्रकाराला यापूर्वी दैनिक पुढारीने वाचा फोडली होती. त्यानंतर सखल भागात खडी क्रशर सुरू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यावसायिकावर सावर्डे पंचायतीला कारवाई करावी लागली होती. त्यात स्वरूपाचा आणखी एक खडी क्रशर व डांबर तयार करण्याचा एक प्रकल्प कोणत्याही परवानगीशिवाय इथे दोन वर्षांपासून सुरू आहे.
प्रक्रियेदरम्यान या दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होत आहे. ज्यामुळे अल्पावधीतच हा संपूर्ण परिसर धुळीने पूर्णपणे काळवंडून गेलेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण खाते, फॅक्टरीज व बॉयलर, वन खाते अशा कोणत्याही खात्यांच्या परवानगीशिवाय चालणारे हे प्रकल्प रहिवाशांसाठी डोकेदुखी बनू लागले आहेत.
आंबेउदक येथील धनेश देसाई यांनी पुढारी जवळ बोलताना पूर्वी रात्री अपरात्री कारखाने चालवले जायचे. त्या कणकर्कश आवाजामुळे लोकांची झोपमोड होत होती. विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नव्हते. कित्येकवेळा त्या कारखान्यांच्या मालकांशी संपर्क साधून गावातील व्यथा त्यांच्यापुढे मांडण्यात आल्या. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
आम्ही गप्प राहिल्याचे परिणाम आता आम्हाला भोगावे लागत आहेत. गावात पाण्याची कमतरता आहे. आताच कुठे एवढ्या वर्षांनंतर आम्हाला नळाची जोडणी मिळालेली आहे; पण साठवून ठेवलेले पाणी धुळीमुळे काळवंडू लागल्याने हे पाणीच आमच्यासाठी विष बनवू लागले आहे, असे देसाई यांनी सांगितले.
घरातील भांडी धुळीने माखून जातात. कारखान्यातून निर्माण होणारे विशिष्ट प्रकारची भूकटी स्वयंपाक घरातील भांड्यांना चिकटून बसते. वारंवार धुवून ती भांडी वापरावी लागतात. हे पटवून देण्यासाठी त्यांनी घरातील लाल झालेल्या पाण्याचे उदाहरण दिले.
हरित लवादाकडे जाण्याचा इशारा
सुमारे दीड वर्षांपासून आम्ही हा प्रकार सहन करत आहोत; पण यापुढे कोणत्याही प्रकारे हे सहन करून घेतले जाणार नाही. सावर्डे पंचायतीने अशा प्रकल्पांची पाहणी करून बेकायदेशीर असलेल्या प्रकल्पांना टाळे ठोकावे.
तसेच त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करून घ्यावी; अन्यथा या प्रकल्पाच्या विरोधात हरित लवादाकडे धाव घेण्याचा एकमेव पर्याय आमच्याकडे शिल्लक राहत आहे, असा इशारा त्यांनी दिला.
... अन्यथा कायदा हाती घेण्याची वेळ
बुधवारपासून गावात धूळ पसरत आहे. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर भुकटी बाहेर पडत असून समोरचा व्यक्ती सहज दिसणे शक्य होत नाही. घरातील वृद्धांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. बुधवारी आपण त्या कारखान्यात जाऊन तो खडी क्रशर बंद पाडला. संबंधित क्रशरच्या मालकाला क्रशर सुरू करू नका, असे बजावले.
या व्यावसायिकांना गावकऱ्यांचे काहीच पडून गेलेले नाही. त्यामुळे आता आम्ही गप्प राहणार नाही. लोकांचा विरोध असताना सुद्धा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा हाती घेतला जाईल, असा इशारा धनेश देसाई व ग्रामस्थांनी दिला आहे.