

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बार्देश तालुक्यातील म्हापसा, हणजूण, आसगाव, हडफडे आणि कळंगुट परिसरात अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवत विविध खाद्य व्यवसायांवर धडक कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान रेस्टॉरंट, फूड व्हेंडिंग आस्थापने, स्वीट मार्ट तसेच स्ट्रीट फूड विक्रेत्यांसह एकूण २० खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत कृत्रिमरीत्या पिकवलेली सुमारे २१ हजार रुपये किमतीची ३०० किलो केळी नष्ट करण्यात आली.
तपासणीत स्वच्छतेचे निकष न पाळणे तसेच परवाने नूतनीकरण न केल्याचे आढळल्याने ८ आस्थापनांना तात्पुरते बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ही केळी कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी प्रतिबंधित रसायनांचा वापर करण्यात आला होता.
यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करत सुमारे २१ हजार रुपये किमतीची ३०० किलो केळी जप्त करून नष्ट केली. वैध नोंदणी प्रमाणपत्राशिवाय खाद्य व्यवसाय चालवणाऱ्या एका हॉकर्स विक्रेत्यावर २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
ही कारवाई संचालिका श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी रिचर्ड नरोन्हा तसेच लेनिन दे सा, अमित माद्रेकर, डार्लेन दिवकर आणि नौसिन मुल्ला यांनी केली.