

पणजीः पुढारी वृत्तसेवा
रो रो फेरीबोटी उत्पन्न मिळविण्यासाठी नाहीत, तर लोकांच्या सेवेसाठी आणि बेटांवरील प्रवासी सेवा सुधारण्यासाठी आहे, असे मत नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मांडले. आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी माहितीच्या अधिकारात रो रो फेरीवरील खर्च आणि उत्पन्न याबाबत माहिती मिळवली होती.
त्यात भाड्यासाठी सरकारने ७ कोटी ३४ लाख रुपये दिल्याचे तर सरकारला ७४ लाख उत्पन्न मिळाल्याचे उघड झाले होते. त्यावर मंत्री फळदेसाई बोलत होते. त्यांनी सांगितले की, आम्ही या फेरी लोकांच्या सेवेसाठी सुरू केल्या आहेत, सरकारला उत्पन्न मिळवून देण्यासाठी नाहीत.
आम्ही प्रवासी व दुचाकीसाठी शुल्क आकारत नाही. चारचाकींसाठी मासिक पासची सोय केली आहे. आम्हाला उत्पन्न मिळते ते पर्यटक टॅक्सीकडून. जर शुल्क आकारत नसू तर उत्पन्न मिळणार कसे, असा प्रश्न विचारून फळदेसाई म्हणाले.
महसूल मिळवणे हा त्यामागचा उद्देशच नाही
राज्यातील १८ मार्गावर ३२ फेरीबोट धावतात. त्यातून मिळणारे ८० लाख उत्पन्न आता १ कोटी ६० लाख झाले आहे. आम्ही ५० कोटी घातले तर ५० लाख म्हणजे १ टक्के उत्पन्न मिळते. मात्र, रो रो फेरीत ७ कोटी घातले तर ७० ते ८० लाख रुपये म्हणजे १० टक्के उत्पन्न मिळते. त्यामुळे रो रो फेरी तोट्यात नाही. मुळात महसूल मिळवणे हा त्यामागचा उद्देशच नाही, असेही फळदेसाई म्हणाले.