

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान गोव्यात येणार असून, पर्वरी उड्डाणपूल व केपे तालुक्यात बांधल्या जात असलेल्या कुणबी व्हिलेज या दोन प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर नव्या प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
डिसेंबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे पंतप्रधानांचा गोवा दौरा हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर सहकुटुंब गेलेले मुख्यमंत्री डॉ. सावंत गुरुवारी (दि. २८) गोव्यात परतले. त्यानंतर त्यांनी आल्तिनो-पणजी येथे बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना दिल्ली भेटीची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, पर्वरी उड्डाणपूल व कुणबी व्हिलेजचे काम पावसाळ्यानंतर लगेच पूर्ण होईल. या दोन्ही प्रकल्पांच्या उद्घाटनाला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांना गोव्यात येण्याचे आमंत्रण आपण दिले आहे. त्यावेळी अनेक नव्या प्रकल्पांची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होईल. पंतप्रधानांकडे आपण गोव्यातील रेतीची समस्या मांडली आहे. ही समस्या सोडवून व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी केली, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
भाजपच्या राज्य कार्यालयाच्या उद्घाटनाचे शहांना आमंत्रण
दिल्ली भेटीत आपण गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. रायबंदर बायपासजवळ बांधण्यात येत असलेल्या भाजपच्या राज्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी त्यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनाही आमंत्रण दिले आहे. शहा यांच्यासोबत गोव्यातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेत राज्यातील आदिवासींना लवकरात लवकर राजकीय आरक्षण मिळावे व राज्यातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी योग्य ते सहकार्य द्यावे, या मागण्यांचा समावेश होता, असे समजते.
संगीतावरील वेळनिर्बंध शिथिल करण्याचा विचार
गोव्यात रात्री १० वाजल्यानंतर संगीतावर असलेल्या निर्बंधांमुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठी येणारे पर्यटक व्हिएतनामसारख्या परदेशी ठिकाणांकडे वळत असल्याने ध्वनी प्रदूषण कायद्यात काही सुधारणा करून निश्चित मनोरंजन क्षेत्रात शिथिलता देण्याचा सरकारचा विचार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ध्वनी प्रदूषण नियमांमध्ये बदल करण्याबाबत केंद्र सरकारशीही चर्चा झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री सावंत यांनी हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी या विषयावर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी नमूद केले.