

पणजी : पुढारी वृत्तसेवा
क्रांतिदिनी राज्य सरकारच्या वतीने पणजी येथील आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावत आदी मान्यवरांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, केंद्रीय राज्य ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, वीज मंत्री सुदिन ढवळीकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेले महाराष्ट्रातील चंद्रपूरचे स्वातंत्र्यसैनिक बाबुराव थोरात यांच्या बलिदानाचा सन्मान करत त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. जुलियाओ मिनेझिस आणि गोवा मुक्तिसंग्रामातील शूर हुतात्म्यांचा उल्लेख करत त्यांना राज्यातर्फे आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या २७ मुलांना सरकारी नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली आणि मुक्तिसंग्रामाशी संबंधित कुटुंबांच्या कल्याणासाठी व सक्षमीकरणासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी केलेल्या धाडसी पत्रकारितेच्या योगदानाबद्दल दोन वर्तमानपत्रांचाही यावेळी गौरव केला.