

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात सरकारी प्राथमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, ३९० शिक्षक पदांसाठी तब्बल २,०६३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे प्रत्येक पदासाठी सरासरी पाच उमेदवार स्पर्धेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भरती प्रक्रिया कर्मचारी निवड आयोगामार्फत राबविण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एकूण ३९० पदांमध्ये कोकणी आणि मराठी माध्यमातील शिक्षक पदांचा समावेश आहे. यामध्ये कोकणी शिक्षकांच्या पदासाठी ४३७ अर्ज, तर मराठी शिक्षकांच्या पदांसाठी १,६२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीमुळे राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटत असतानाच शिक्षक भरतीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. जिल्हा माहिती प्रणालीच्या २०२४-२५ च्या अहवालानुसार, गोव्यातील खासगी अनुदानित नसलेल्या शाळांमध्ये ४१,१४६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर सरकारी शाळांमध्ये सुमारे ५५,९७४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत.
राज्यात सध्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत ७७३ सरकारी शाळा कार्यरत असून, ५५८ खासगी अनुदानित असलेल्या शाळांमध्ये एकूण २.१८ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थीसंख्या खासगी अनुदानित नसलेल्या शाळांमध्ये असल्याचे दिसून आले आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल सरकारी शाळांकडून खासगी शाळांकडे वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे.
पायाभूत सुविधा, आधुनिक प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण या कारणांमुळे अनेक पालक खासगी शाळांना प्राधान्य देत असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अलीकडेच पालकांना आपल्या मुलांना सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले होते. सरकारी शाळांमध्ये सुधारित सुविधा आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला होता.