

Congress Goa Forward Alliance Talks Deadlock
पणजी : काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टी (आरजी) या तीन पक्षांनी भाजप विरोधी आघाडी करण्याची तयारी सुरू केलेली असताना आरजी पक्षाने तब्बल सोळा जागा मागितल्याने काँग्रेसला आरजी पक्ष नाकापेक्षा मोती जड झाला आहे. तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेस सोबत युतीची चर्चा करण्याची स्थगिती उठवल्यानंतर फक्त एक साधी बैठक झाली. त्यात काहीच ठोस चर्चा झालेली नाही. त्यामुळे विरोधी आघाडीत बिघाडी तर झालेली नाही ना अशी चर्चा सुरू आहे.
काँग्रेस व गोवा फॉरवर्ड व्यांच्यात जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा न झाल्याने सत्ताधारी भाजपविरोधी आघाडीबाबत अनिश्चितता वाढली आहे. त्यात भर म्हणून आरजी पक्षाने काँग्रेसकडे तब्बल सोळा जागांची मागणी केल्यामुळे विरोधी आघाडीचा गुंता वाढला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रस्तावित विरोधी आघाडी अनिश्चित आहे. कारण काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांनी एकत्र येण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या निवडणुकांच्या खूप आधी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी मागणी भाजपविरोधी घटकांकडून होत असूनही, चर्चेला गती मिळताना दिसत नाही.
लोकांची इच्छा आहे की, सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्यासाठी गोवा फॉरवर्ड, काँग्रेस, आरजीपी आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र यावे. तथापि, आम आदमी पक्षाने या आघाडीत सामील न होता स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
प्रतिसादाची वाट पाहतोय : सरदेसाई
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, काँग्रेससोबतची चर्चा स्थगित करण्याचा आपला पूर्वीचा निर्णय मागे घेऊन त्यांच्या पक्षाने अलीकडेच काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. गोवा फॉरवर्ड आघाडीच्या बाजूने असलेल्या जनभावनेचा आदर करते. विरोधी शक्तींना एकत्र आणण्यास उत्सुक आहे. आम्ही अलीकडेच काँग्रेस नेत्यांसोबत एक छोटी बैठक घेतली. सविस्तर चर्चा अद्याप होणे बाकी आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट मागण्या केलेल्या नाहीत. सर्वांनी मिळून ही निवडणूक कशी लढावी, यावर काँग्रेसच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.