

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पोलिस अधीक्षक एडविन कुलासो यांनी गृह खात्याला पूर्वसूचना न देता पोर्तुगालमध्ये जाऊन जन्म आणि विवाह नोंदणीची - प्रक्रिया पूर्ण केल्याचा आरोप आहे. या कथित नोंदण्या २००८ ते २०१० या कालावधीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात २०१४ मध्येच पोलिसांत तक्रार दाखल झाली होती.
दक्षता खात्याच्या चौकशीत प्राथमिक आरोपांची पुष्टी झाल्यानंतर सरकारने त्यांना निलंबित केले असून, आता या प्रकरणाची सविस्तर खात्यामार्फत चौकशी सुरू करण्यात येणार आहे. या चौकशीत नियमभंगाचे स्वरूप आणि व्याप्ती निश्चित करून पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गंभीर आरोप असूनही कुलासो यांच्याकडे अतिरेकीविरोधी कक्षाची (एटीएस) संवेदनशील जबाबदाऱ्या कशा सोपविण्यात आल्या,
याबाबतही दक्षता खात्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलाको यांच्या कथित पोर्तुगाल दौऱ्याची चौकशी काही वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मात्र, ती अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचली नव्हती. अलीकडील चौकशीदरम्यान त्यांना भारतीय पासपोर्ट सादर करण्यास सांगितले असता, त्यांनी तो हरवल्याचे सांगत जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याची माहिती समोर आली आहे.