

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वाहन चालकांकडून अधिकृत चलन न देता पैसे वसूल केल्याचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच पोलिस कर्मचाऱ्यांची रिझर्व्ह लाईनमध्ये बदली केली आहे.
या व्हिडीओमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, वाहतूक तपासणीदरम्यान वाहन चालकांकडून कथितरित्या रोख स्वरूपात पैसे घेतले जात असल्याच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकासह, एक हवालदार व तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना रिझर्व्ह लाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राज्याच्या सर्व पोलिस तपासणी नाक्यावरील पोलिसांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.