

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटर्ससाठी गोवा हे पसंतीचे ठिकाण बनत असल्याची धक्कादायक माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. कमी वर्दळ असलेली व्यावसायिक संकुले, बंगले आणि निवासी इमारतींमधून ही कॉल सेंटर्स चालवली जात असून, केवळ गेल्या महिनाभरातच पोलिसांनी अशा चार बनावट कॉल सेंटर्सवर छापे टाकले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी जाणीवपूर्वक निर्जन आणि कमी लोकवस्तीच्या परिसरांची निवड करतात, जेणेकरून त्यांच्या बेकायदेशीर कारवायांची माहिती स्थानिकांना मिळू नये. ही कॉल सेंटर्स प्रामुख्याने अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत कार्यरत असतात.
गेल्या वर्षभरात गोवा पोलिसांनी २५ हून अधिक बनावट कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला असून, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, नागालैंड आणि मणिपूरमधील सुमारे १०० तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश जण २५ ते ३० वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कॉल सेंटर्समधून फसवी कर्ज मंजुरी, वैद्यकीय बिलिंग अॅडव्हान्स, तांत्रिक सहाय्य आणि इतर विविध ऑनलाइन घोटाळ्यांच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले जात GOA POLICE असल्याचे तपासात उघड झाले आहे.
गोवा पोलिस प्रमुखांनी राज्यातील सर्व स्थानिक पोलीस स्थानके, गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे शाखेला बनावट कॉल सेंटर्सबाबत गुप्त माहिती गोळा करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात एकही बनावट कॉल सेंटर कार्यरत राहता कामा नये, असे सक्त सूचनाही केल्या आहेत.
गोव्यातील नाइटलाईफ आणि जीवनशैलीमुळे देशभरातील अनेक तरुण या कॉल सेंटर्समध्ये काम करण्यासाठी आकर्षित होतात. भरतीनंतर त्यांना ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ठरावीक स्क्रिप्ट, संभाव्य प्रश्नांची उत्तरे आणि फसवणुकीच्या पद्धती शिकवल्या जातात. तपासादरम्यान, या बनावट कॉल सेंटर्सचे परदेशातील एजन्सींशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.
या एजन्सींकडून कॉल गोव्यातील ऑपरेटर्सकडे वळवले जातात. प्रत्येक कॉल डायव्हर्ट करणाऱ्या व्यक्तीला ४ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिली जाते, तर कर्मचाऱ्यांना दरमहा १५ हजार ते २५ हजार रुपये पगार दिला जातो, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. फसवणुकीतून मिळणाऱ्या रकमेच्या आधारे अतिरिक्त प्रोत्साहनपर बोनसही दिला जातो.
एखाद्या पीडित व्यक्तीकडून मोठी रक्कम उकळण्यात यश आल्यास कर्मचाऱ्यांना १ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर बक्षीस दिले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान, काही आरोपींनी चौकशीदरम्यान भारतीयांना नव्हे, तर परदेशी नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे सांगत आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, सायबर फसवणूक हा गंभीर गुन्हा असून त्याविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.