पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पेडणे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांमध्ये पुन्हा एकदा संतापाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. अनेक वर्षे सत्तेत राहूनही स्थानिकांना न्याय मिळवून देता आला नाही, उलट गोड बोलून आश्वासने देत प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करण्यात आल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेतून "या प्रश्नांची उत्तरं आता कोण देणार?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लाखो चौरस मीटर जमीन संपादित करताना स्थानिक शेतकऱ्यांना सरकारी नोकऱ्या व्यवसायात प्राधान्य, रॉयल्टी, कायमस्वरूपी रोजगार आणि स्थानिकांना टॅक्सी व इतर वाहतूक व्यवसायात संधी देण्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू व अन्य राज्यातील टॅक्सी व्यावसायिक कार्यरत आहेत. आजवर झालेल्या मंत्री आणि आमदारांमुळे प्रकल्पग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याच्या प्रतिक्रिया आता पेडणे मतदारसंघात उमटू लागल्या आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी स्वतःच्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या, त्यांनाच न्यायासाठी पोलिस ठाणे, न्यायालय आणि सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या. काहींनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव आणला गेला. यातून अनेकांना आपले व्यवसायही बंद करावे लागल्याचे स्थानिक सांगतात. मोप मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील काही कुटुंबांचे पुनर्वसन आजही पूर्ण झाले नसल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः तळकटकर आणि साळगावकर कुटुंबांना अद्याप संपूर्ण न्याय मिळालेला नसल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू...
राजकीय वर्तुळातही आता २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, ज्यांनी प्रकल्पग्रस्तांना आश्वासनांच्या नावाखाली फसवले, त्यांना पुन्हा संधी देणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, अशी भावना अनेकजण व्यक्त करत आहेत.