सुरक्षा रक्षकाचा कान कापून उद्योजक वृद्ध दाम्पत्याला पलंगाला बांधून दरोडा; कोटींचा ऐवज लंपास
पणजी : पुढारी वृत्तसेवा : नागाळी-दोनापावला येथे राहणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश धेंपे (वय ७७) व त्यांची पत्नी पद्मिनी (वय ७१) या वृद्ध दाम्पत्याला पलंगाला बांधून व त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून तीन दरोडेखोरांनी शनिवारी मध्यरात्री दरोडा टाकला. त्यांनी दागिन्यांसह कोट्यवधींचा ऐवज लंपास केल्याचे उघड झाले आहे. (Goa Robbery Case)
दोनापावला येथील धेंपे कुटुंबाच्या निवासस्थानी शनिवारी मध्यरात्री हत्यारांनी सुसज्ज तीन दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. रात्री १२ ते सकाळी ४ या दरम्यानच्या काळात ही घटना घडली.
दरोडेखोरांनी सुरुवातीला सुरक्षा रक्षकावर हल्ला करून त्याला मारहाण केली आणि नंतर बंगल्यात प्रवेश केला. धक्कादायक बाब म्हणजे दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरक्षा रक्षकाचा कानही कापला. घराचा दरवाजा जयप्रकाश धेंपे यांनी उघडला होता. यावेळी घरात फक्त ते दाम्पत्य होते. दरोडेखोर त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेले व त्यांनी दाम्पत्याला पलंगाला बांधले. त्यानंतर चोरट्यांनी घरात लूट केली. रविवारी सकाळी घरकाम करणारी महिला बंगल्यावर पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तिने वृद्ध दांपत्याची सुटका करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पणजी पोलिस ऍक्शन मोडवर
पणजी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. फिंगरप्रिंट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडूनही धागेदोरे मिळवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उत्तर- गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली. तर, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा म्हणाल्या.

