Thalapathy Vijay political impact | विजयना राजकारणाची झळ

Thalapathy Vijay political impact | विजयना राजकारणाची झळ
Thalapathy Vijay
Thalapathy Vijay
Published on
Updated on

विजयना राजकारणाची झळ

हे विजय गोवा फॉरवर्डचे नव्हे. आता विजय या नावाने गोव्यात बराच गोंधळ सुरू आहे. गोष्ट आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांची. दक्षिणेकडील राज्यांत फिल्मस्टार्सची क्रेझ काही वेगळीच असते. या लाटेवर स्वार होऊन एम.जी. रामचंद्रन, जयललिता यांच्यासारखे अभिनेते मुख्यमंत्री झालेले आहेत. आपण करू ते निमूटपणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. मात्र थलपती विजय यांचा एक निर्णय वादग्रस्त ठरला आणि २४ तासांच्या आत त्यांना तो मागे घ्यावा लागला. त्यांनी त्यांचे ज्योतिषी रिकी राधन पंडित यांना ओएसडी नेमले होते. ज्योतिषावर कुणी विश्वास ठेवावा की नाहीं हा वैयक्तिक विषय आहे. परंतु सरकारमध्ये ज्योतिषशास्त्र येऊ नये अशी टीका खुद्द त्यांच्याच सहयोगी पक्षांनी केल्यानंतर त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. राजकारण म्हणजे काय हे हळूहळू विजयना कळू लागेल असे दिसते.

देवाची प्रथम भाषा कोणती ?

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सध्या गोवा दौऱ्यावर आहे. गोव्याचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी इतरांसोबत युतीची तयारी दाखवल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट आहे. त्यामुळे या भेटीकडे अनेकांचे लक्ष आहे. या भेटीत केजरीवाल यांनी शिवोलीतील स्वामी समर्थ मठाला भेट देऊन पूजा केली. मागील वेळी एका मंदिराला भेट दिली असता गुरुजींनी इंग्रजीत घातलेले गाऱ्हाणे बरेच व्हायलर झाले होते. शिवोली मठात कोणत्या भाषेत गाऱ्हाणे घातले गेले माहिती नाही. सध्या गोव्यात कोकणी-मराठी वाद सुरू असताना देवाची प्रथम भाषा कोणती यावरही एखादी चर्चा रंगू शकते.

सरकारी नोकरीसाठी वणवण

गोव्यात हातात पदवी घेतल्यानंतर प्रत्येक तरुणाला सरकारी नोकरी पाहिजे असते. ती मिळवण्यासाठी ते किंवा त्यांचे पालक आमदार, मंत्र्यांच्या घराचे उंबरठे झिजवत राहतात. काही जण तर २० हजाराच्या सरकारी नोकरीसाठी ५० हजारांची खासगी नोकरीही सोडायला तयार असतात. कारण काय तर नोकरीची खात्री, शनिवार रविवार सुट्टी. कामाचा, ताणाचा काही प्रश्न नाही. आपल्या गतीने कामे करतात येतात. पोलिस कॉन्स्टेबलच्या ४७९ पदांसाठी तब्बल २५ हजार अर्ज आले आहेत. अर्ज करणाऱ्यांत वकील आणि इंजिनिअरही आहेत, आता बोला!

अखेर भीती खरी ठरली रिव्होल्यूशनरी

गोवन्स पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकर यांनी गुरुवारी सोशल मीडियावर स्वतःला अध्यक्ष घोषित केले आहे. त्यामुळे मनोज परब दोन दिवस जे काही पोस्ट करत होते त्यात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांत नेमका काय वाद आहे, अगोदर ३९ ए आणि आता साईड इफेक्ट या वीरेश यांच्या पोस्टचा काय अर्थ आहे याचे कोडे अनेकजण उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही जण पक्ष बळकावू पाहत आहेत असे मनोज परब म्हणाले होते ते खरे ठरले आहे. अर्थात 'बळकावणे' हा शब्द सापेक्ष आहे. कारण सध्या तरी विधिमंडळ पक्षाचे अध्यक्ष वरिशच आहेत. आता त्यांनी बहुदा पक्षाध्यक्ष पदावरही दावा केला आहे. आरजी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची भीती दुर्दैवाने खरी ठरली आहे.

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल कमी वापरा असे आवाहन केले. त्यानंतर मंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा कमी करावा असे आवाहनही केले. फक्त आवाहन करून राहिले नाहीत, तर पंतप्रधानांनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्याही कमी केल्या. इतर भाजपशासित राज्यांतील मंत्र्यांनीही गाड्या कमी केल्या. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करून मंत्र्यांसमोर एक उदाहरण ठेवले आहे. अर्थात, गोव्यात गाड्यांचा ताफा घेऊन जायची तशी क्रेझ नाहीच आहे.

Thalapathy Vijay
Goa Engineering College recruitment - गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३७ पदे भरणार

काळा दिवस

गोव्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गौतम खट्टर यांच्या विधानाने वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी लगेच हालचाली केल्या होत्या. तो सापडला नाही तेव्हा त्याच्या भावाला अटक केली. मात्र हिंदू देवदेवतांवर टिप्पणी करणाऱ्या लोकांवर मात्र त्याच तत्परतेने कारवाई झाली नाही असे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. आता हिंदू एकता मंच नावाच्या संघटनेने सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी ज्या दिवशी पोर्तुगालच्या राजाला गोव्यात इन्क्विझिशन सुरू करण्याचा सल्ला देणारे पत्र लिहिले तो १६ मे (१५४६) हा दिवस काळा दिन जाहीर करण्याची मागणी केली आहे. अशी काही मागणी मान्य होण्याची शक्यता नसली तरी आता गोव्यातही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत असल्याची ती चिन्हे आहेत.

विकासाने आणले दोघांना एकत्र

विकासकामांनीच मंत्री सुभाष फळदेसाई आणि वेळ्ळीचे 'आप' आमदार कुझ सिल्वा यांना एकाच व्यासपीठावर आणल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी 'सां जुझे दी आरियल' गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून या दोघांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते; त्यावेळी सुभाष यांना स्थानिक जनतेच्या एका वर्गाच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. मात्र, दोन वर्षांनंतर, यावेळी जुन्या झालेल्या जलवाहिनीच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या नूतनीकरणाचा पायाभरणी समारंभपार पाडण्यासाठी मंत्री महोदय पुन्हा आरियल गावात आले होते. यावेळी या दोघांमध्ये केवळ सलोख्याचे संबंध असल्याचेच दिसून आले नाही, तर मंत्री महोदयांनी आमदारांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचे कौतुकही केले.

Thalapathy Vijay
Goa IT sector impact on joint family system | शिक्षण गोव्यात, करिअर बाहेर

निवडणुकीपूर्वी काँग्रेस आमदार भाजपकडे?

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना भाजप आपल्याकडे वळवण्याचा (फोडण्याचा) प्रयत्न सुरू आहे का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या गोटात आणि बाहेरही चर्चेचा मुख्य विषय बनला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चाचे अटकळींचे ना समर्थन केले आहे, ना खंडन. तरीही, अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, राज्यात निवडणुका येण्यास अवघे आठ महिने बाकी असताना आमदारांना आपल्याकडे वळवण्याची गरजच काय असावी? साहजिकच, याबद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे. लोकांना त्याचे कारण माहीतच असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news