

पर्वरी : विकसनशील पर्वरी मतदारसंघात विखुरलेला कचरा, मोडकळीस आलेल्या सरकारी इमारती वगैरे गोष्टींचा गालबोट लागल्याचे दृश्य सर्वत्र दिसते. सोबतच्या छायाचित्रात पेन्हा द फ्रान्स पंचायतीच्या प्रभाग क्र. ८ मधील वहिवाटीच्या रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्याचे विकृत आणि गलिच्छ दृश्य दिसत आहे. गेले कित्येक महिने या रस्त्यावर कचरा फेकण्याचे काम चालू आहे. येथील रहिवाशांनी यासंबंधी अनेकवेळा संबंधित पंचायतीत तक्रार केली, परंतु आजतागायत तो कचरा विखुरलेल्या स्थितीत दिसतो.
रस्त्यालगत कचरा फेकू नये, फेकणाऱ्यांवर पाच हजार रुपयांचा दंड ठोकला जाईल, असा सावधानतेचा इशारा देणारा फलक लावला आहे. पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे एकापारीने पर्वरी मतदारसंघात विविध जनोपयोगी विकासकामे करीत आहेत. सुंदर पर्वरी, हरित पर्वरी आणि स्वच्छ पर्वरी ही त्यांची घोषणा आहे. परंतु मतदारसंघात विखुरलेल्या गलिच्छ कचऱ्यामुळे त्यांच्या घोषणेला गालबोट लागले आहे.
आता दोन दिवसांत पावसाळ्यास सुरुवात होणार आहे. डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगांचा या कचऱ्यापासून डासांची पैदास येथील वातावरणात होऊ शकते, बाजूला सायन्सपार्क प्रकल्प आहे, तसेच हाऊसिंग बोर्डाच्या जुन्या इमारतीमध्ये मोठ्या संख्येने रहिवासी राहात आहेत त्यांना या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पेन्हा द फ्रान्स पंचायतीने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
विखुरलेल्या कचऱ्यासंबंधी प्रभाग क्र. ८ मधील पंच सदस्य सिद्धेश नाईक यांना विचारले असता अनेकवेळा काही रहिवासी रात्री-अपरात्री छायाचित्रात दाखवलेल्या ठिकाणी कचरा फेकतात. त्यांनी पंचायत मंडळाला सीसीटीव्ही लावण्याची सूचना केली आहे, असे सांगितले.