

पणजी : तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवून ते रिकामी करण्यासाठी अनेक स्कॅमर (घोटाळेबाज) टपून बसले आहेत.या सायबर गुन्हेगारांच्या वेगवेगळ्या युक्त्यांना फसून कित्येकांनी आपली जीवनभराची पुंजी गमावली आहे.आता तर स्कॅनर तुमची पार्सल डिलिव्हरी अयशस्वी झाल्याचा दावा करणारे बनावट एसएमएस किंवा ईमेल पाठवत आहेत. ते तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यास, तुमचा पत्ता अपडेट करण्यास आणि पुन्हा डिलिव्हरी करण्यासाठी एक किरकोळ फी भरण्यास सांगतात.पण, या फसव्या वेबसाइट आहेत. जर तुम्ही तुमचे कार्ड तपशील किंवा ओटीपी टाकला, तर तुमच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात पैसे चोरीला जाऊ शकतात. राज्यात अशा प्रकारची दोन प्रकरणे सायबर गुन्हे विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत.
त्यातील पहिल्या प्रकरणात,एका महिलेला तिचे इंडिया पोस्ट पार्सल डिलिव्हर करता येत नाही, असा एसएमएस आला आणि तिला लिंकद्वारे 10 रुपये 25 पैसे भरण्यास सांगितले. तिने किरकोळ रक्कम आहे, असे समजून लिंकवर क्लिक केले आणि ओटीपी टाकला. मात्र,क्षणात तिच्या क्रेडिट कार्डमधून 25,782 रुपये कापले गेले.
दुसऱ्या प्रकरणात एका पुरूषाला ‘डीटीडीसी कुरिअर’ कडून असल्याचा दावा करणारा मेसेज आला व मेसेजद्वारा 25 रुपये परत मागत होता. त्या पुरुषाला खऱ्या दिसणाऱ्या वेबसाइट लिंकवर क्लिक केले आणि पैसे देण्यास सुरुवात केली. बघता बघता ओटीपी ऑटोफिल (आपोआप घातला गेला) झाला आणि थोड्याच वेळात त्याला त्याच्या बँकेकडून 85,238 रुपये कपात झाल्याचा मेसेज आला. शाप्रकारे फसवणूक होत असल्याने प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.