

शिवोली-गोवा येथे दरवर्षी जागरोत्सव म्हणजे हिंदू व ख्रिश्चन बांधवांमधील धार्मिक सलोख्याचे प्रतीक म्हणावे लागेल. परंपरेनुसार या दोन्ही धर्मांमधील निवडक घराण्यांतील मानकरी माणसे मिळून पिढ्यानपिढ्या हा उत्सव साजरा करीत असतात. त्यामुळे हिंदू व ख्रिश्चन अशा दोन संस्कृतींचा अनोखा मिलाफ त्यातून प्रत्ययास येतो. यंदा हा उत्सव सोमवारी 1 जानेवारी रोजी साजरा झाला. (Goa News)
गोव्यात काही निवडक तथा मोजक्याच ठिकाणी होणारे जागरोत्सव प्रामुख्याने हिंदू समाजातील गावडा जातीतील लोक सादर करीत असतात. परंतु बार्देश तालुक्यातील जागर हिंदू व ख्रिश्र्चन अशा दोन्ही धर्मांतील गावडा समाजांतील व्यक्ती सादर करीत असतात, हे वैशिष्ट्य आहे. दोन्ही धर्मांच्या इतरही जातींतील काही लोक परंपरेनुसार त्यात सहभागी होत असतात. (Goa News)
पोर्तुगीज राजवटीच्या काळात हा उत्सव सुरू झाला होता. पोर्तुगिजांच्या अमानुष-जुलमी राजवटीत त्यांनी गोव्यातील कित्येक हिंदूंना धर्म बदलायला भाग पाडले होते. त्यामध्ये बहुतांश प्रमाणात गावडा समाजातील लोकांचे धर्मांतरण झाले. अशा गावडा जातीतील लोकच गोव्यातील विविध भागांत जागर साजरा करीत असतात. परंतु शिवोली येथील जागरोत्सव दोन्ही धर्मांतील लोक संयुक्तपणे साजरा करीत असतात. (Goa News)
शिवोलीतील जागरोत्सव सर्वसाधारणपणे ख्रिस्तीबांधवांच्या नाताळ सणानंतर येणार्या पहिल्या सोमवारी साजरा केला जातो. परंतु याला एक अपवाद आहे. एखाद्या वर्षी शिवोली येथील चर्चचे फेस्त व जागराची तिथी एकाच दिवशी अर्थांत त्या सोमवारी असल्यास जागरोत्सव मंगळवारी साजरा केला जातो.
गुडे-शिवोली येथील श्री जागरेश्वर देवस्थानच्या ठिकाणी हिंदुबांधव देवासाठी अर्थांत तेथील ज्योत प्रज्वलित राहावी यासाठी खोबरेल तेल वाहतात, तर ख्रिस्तीबांधव त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार मेणबत्त्या प्रज्वलित करतात.
वास्तविक, जागर हा लोकनाट्याचा एक प्रकार आहे. किंबहुना, त्याला विधिनाट्य असेही संबोधले जाते. त्या नाट्याची सुरुवात रात्री ठीक बारा वाजता होते व ते दुसर्या दिवशी पहाटे उजाडेपर्यंत ते विधिनाट्य व अन्य तत्सम विधी सुरूच असतात. त्याअंतर्गत विविध पारंपरिक पात्रांचे सादरीकरण होते. त्या वेळी विविध पात्रे ओवीगायनाच्या तालावर नृत्य करून लयबद्ध संवादही सादर करतात. त्या ओवीगायनाला गोव्यातील पारंपरिक घुमटवादनाची साथ असते. घुमट हे गोव्याचे लोकवाद्य आहे. लोकनाट्याच्या मध्यंतरावेळी मनोरंजनासाठी म्हणून तियात्र हा गोव्यातील कोकणी लोकनाट्य प्रकार सादर केला जातो. अशा प्रकारे दरवर्षी हजारो भाविकजनांच्या उपस्थितीत हा जागरोत्सव साजरा केला जातो.