पणजी : राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुढील चार दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंत (दि. २८) येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. या काळात राज्यात पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
दरम्यान, १ जून ते २५ जुलै या कालावधीत गोव्यात सरासरी ११६८.४ मिमी (४६ इंच) पावसाची नोंद झाली. पावसाने अद्याप अर्धशतकी गाठलेले नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा ३४.५ टक्के कमी पाऊस पडला आहे. उत्तर गोव्यात ही सरासरी ४२.६ टक्के, तर दक्षिण गोव्यात २७.० टक्के कमी आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यातील विविध भागांत पावसाने चांगली हजेरी लावली.
केपे येथे सर्वाधिक ७८.७४ मिमी, काणकोण येथे ६६.०४ मिमी पाऊस नोंदला गेला. तसेच धारबांदोडा येथे ५३.३४ मिमी, सांगे येथे ४५.७२ मिमी, साखळी येथे ३८.१ मिमी आणि पणजी येथे २५४ मिमी पावसाची नोंद झाली. पणजीत काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, आज पावसाचा जोर थोडा कमी वाटला.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर व दक्षिण गोव्यात पुढील चार दिवस बहुतांश ठिकाणी जोरदार पावसासोबत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, सखल भाग व समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.