

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात मेरशी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जमीन हडपप्रकरणातील संशयित सुलेमान सिद्दीकी याला चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने ईडीचा कोठडीचा अर्ज मंजूर करत तपासासाठी सिद्दीकीची चौकशी आवश्यक असल्याचे मान्य केले.
ईडीकडून सुरू असलेला तपास चार वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी निगडित आहे. या प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावणे, आर्थिक व्यवहार आणि अवैध संपत्तीशी संबंधित बाबींची चौकशी सुरू असून, त्यातून मिळालेल्या पैशांचा मागोवा घेण्याचे काम ईडी करत आहे. ईडीने आतापर्यंत त्याचे अनेक दस्तऐवज तसेच मालमत्ता जप्त केली आहे.
सिद्दीकीविरुद्ध यापूर्वीही जमीन बळकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि इतर फौजदारी गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. काही प्रकरणांत त्याला जामीन मिळाला असला तरी, इतर प्रलंबित गुन्ह्यांमुळे विविध तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
ईडीच्या कोठडीत सिद्दीकीचे आर्थिक व्यवहार, कथित मनी ट्रेल, संबंधित आरोपी आणि मालमत्तांबाबत सखोल चौकशी केली जाणार असून, या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.