

पणजी : विठ्ठल गावडे-पारवाडकर
गोव्यामध्ये घरगुती सिलिंडर उपलब्ध होत असले तरी व्यावसायिक मोठे गॅस सिलिंडर आणि भाड्याने राहणाऱ्या कामगारांसाठी उपयुक्त ठरणारे मिनी गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रेस्टॉरंट बंद होण्याच्या मार्गावर असतानाच आता राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या कामगारांवरही उपासमारीची वेळ येत आहे.
त्यांना स्वयंपाकासाठी मिनी सिलिंडर मिळत नसल्याने व घर मालक इलेक्ट्रिक शेगडी वापरण्यास मज्जाव करत असल्यामुळे उपाशी राहून काम करावे की, गावी निघावे, या संभ्रमात कामगार आहेत. गोव्यात सुमारे दीड ते दोन लाखांच्या आसपास विविध विभागांत काम करणारे परप्रांतीय कामगार भाड्याच्या खोली घेऊन राहतात, यात गवंडी, प्लंबर, कारपेंटर आदी विविध कौशल्य कामांसह रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत.
हे कामगार पूर्वी रॉकेलचा स्टोव्ह वापरत होते. कालांतराने खोलीच्या भिंती काळ्या होत असल्याने घरमालकांनी भाडेकरूंना बाहेर सहज उपलब्ध होणारे निनी सिलिंडर वापरण्याची सक्ती सुरू केली. त्यात दुसरीकडे रॉकेलही मिळेनासे झाले. दुकानात मिनी सिलिंडर विकत घेतल्यानंतर तो हवा तेव्हा ५५० रुपयांत भरलेला बदलून मिळत होता.
हे मिनी सिलिंडर आणि सिंगल शेगडी घेऊन हे कामगार स्वयंपाक करत होते. सध्या सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका-इस्रायलच्या युद्धामुळे मिनी सिलिंडरचा पुरवठाही बंद झाल्यामुळे या कामगारावर संकट आले आहे. काही कामगारांची मुले शाळेत जातात. त्यामुळे मध्येच गावी कसे जावे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर पडला आहे. काही घरमालकांनी तात्पुरत्या विजेवरील शेगड्या वापरण्यास दिल्या असल्या तरी बहुतांश घर मालक नाकार देत असल्याने काम सोडून मूळ गावी जाण्याचा निर्णय हजारो कामगारांनी घेतला आहे.
मिनी सिलिंडर उपलब्ध करा...
लहान साडेपाच किलो वजनाचे सिलिंडर ५५० ते ५८० रुपयांपर्यंत उपलब्ध होत होते. त्यामुळे आमच्या खोलीत आम्हाला जेवण करणे उपयुक्त ठरत होते. आता ते सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने व दुसरीकडे रॉकलही उपलब्ध नसल्याने स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न आमच्या समोर आहे. घरमालक विजेवरील शेगडी वापरण्यास देत नसल्याने आता गोवा सोडण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे सरकारने मिनी सिलिंडर पूर्वी प्रमाणे उपलब्ध करावेत, अशी कामगारांची मागणी असल्याचे साखळी येथील कामगार विधान पासवान यांनी सांगितले.