

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा सरकारने २०१८ मध्ये राज्यात मेट्रो रेल्वे व्यवस्था सुरू करण्याबाबत केली घोषणा होती. मात्र त्यानंतर कुठलाही पाठपुरावा झालेला नाही. गोवा सरकारने केंद्राकडे मेट्रो रेल्वेचा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही, असे उत्तर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार खात्याचे राज्यमंत्री तोखन साहू यांनी दिले.
खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना साहू बोलत होते. जानेवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले होते की गोव्यासाठी मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच तो केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला जाईल.
मात्र, तसा प्रस्ताव अद्याप सरकारने पाठवलेला नाही. गोव्यासारख्या लहान राज्यांसाठी शहरी रेल्वे प्रणालींसाठी कोणता व्यवहार्यता अभ्यास, सर्वेक्षण किंवा प्रस्ताव करण्यात आला आहे किंवा विचाराधीन आहे का आणि असा कोणताही प्रस्ताव प्रलंबित आहे का? असा प्रश्न खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारला होता.