

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एनडीपीएस कायद्याअंतर्गत दोषी ठरलेल्या आरोपी इनोसंट अमामचुक्कू उमेसघा ऊर्फ अमामचुक्कू ओकेके या नायजेरियन नागरिकाने दाखल केलेली फौजदारी अपील याचिका फेटाळून लावत सत्र न्यायालयाने दिलेली १० वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे.
सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये इनोसंट अमामचुक्कू उमेसघा ऊर्फ अमामचुक्कू ओकेके याला दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा दिली होती त्या शिक्षेविरुद्ध ही याचिका दाखल करण्यात आली होती. २०१५ मध्ये शिवोली येथे त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे २.७लाख रुपये किमतीचे २.२ ग्रॅम एलएसडी द्रवरूपातील पदार्थ जप्त करण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवताना सीएफएसएल सविस्तर अहवालात त्रुटी असल्याचा आरोपीचा दावा फेटाळला. न्यायालयाने नमूद केले की, वैज्ञानिक अधिकाऱ्याची उलटतपासणी करण्यात आली होती आणि त्यांनी सादर केलेल्या अहवाल, पत्रव्यवहार व अधिकृत प्रमाणपत्रांवर समाधान व्यक्त केले.