पणजी; पुढारी वृत्तसेवा : मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारातून ५ लाख ८१ हजार रुपयांच्या भंगाराची चोरी झाल्याची तक्रार कंत्राटदार पंकज पहरी (रा. हरमल) यांनी पेडणे पोलिसांत दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी कोलवाळ येथील त्यांचाच कामगार समीर अब्दुल हलीमशहा याला अटक करून त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे.
पंकज पहरी हे मोपा विमानतळावरील कंत्राटदार आहेत. त्यांनी चांगल्या दर्जाचे भंगार दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यासाठी विमानतळ परिसरात ठेवले होते. हीच संधी साधून संशयित समीरने टेम्पो आणला आणि भंगार लंपास केले. समीर हा पंकज यांच्या हाताखालीच काम करतो. १३ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत त्याने हे भंगार लंपास केल्याची तक्रार पेडणे पोलिसांत दाखल होताच पोलिसांनी समीरला पकडून त्याची चौकशी केली. त्यानंतर चोरलेला माल त्याच्याकडून जप्त केला व त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा