

पणजी : जून 2025 पासून बंद असलेली गोवा-लंडन थेट विमानसेवा हिवाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे.राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमानसेवा मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतली आणि मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लंडन गॅटविक विमानतळ दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केली.
आठवड्यातून तीनदा चालणारी ही नॉन-स्टॉप सेवा गोव्यातील पहिली नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा होती, ज्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांसह हजारो गोमंतकीयांना महागडे आणि वेळखाऊ थांबे टाळून अखंड प्रवासाची सोय उपलब्ध होती. तथापि, 21 जून 2025 पासून, एअर इंडिया फ्लाईट 171 च्या दुर्घटनेनंतर ऑपरेशनल समायोजनांमुळे ही उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत.
विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे, असे तानावडे यांनी केंद्रीय मंत्र्यांना सांगितले. यावेळी गोव्यातील प्रवाशांच्या आणि पर्यटनाच्या हितासाठी, लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी दिले.