

मडगाव : गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सज्जता दाखवली आहे. मडगाव-मुंगूल येथे झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाला भेट देऊन गोव्यात गँगवॉर खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
दक्षिण गोवा, उत्तर गोवा पोलिस आणि गुन्हे शाखेकडून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. कुंकळ्ळी येथील पोलिसांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी नोंदणीकृत सुरक्षा एजन्सींची यादी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुरक्षारक्षक ठेवताना केवळ नोंदणीकृत एजन्सीकडूनच नेमणूक करावी, असे आवाहन अलोक कुमार यांनी केले. नोंद नसलेल्या एजन्सींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण गोवा जिल्हा मुख्यालयात झालेल्या बैठकीत गँगवॉर आणि पोलिसांवरील हल्ल्यांचा आढावा घेण्यात आला. उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्यासह इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी या वेळी उपस्थित होते. आरोपींना अटक करून पोलिसांनी गुन्हेगारांना कठोर संदेश दिला आहे. पोलिस दल पूर्णपणे कटिबद्ध आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल आणि जनतेनेही सुरक्षिततेसाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अलोक कुमार यांनी केले.