

Goa Lairai Devi Jatra Stampede Incident
पणजी : शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवामध्ये आज (दि.३) पहाटे तीनच्या सुमारास झालेली चेंगराचेंगरी आणि त्यामध्ये झालेले ६ भाविकांचे मृत्यू हे दाटीवाटीने असलेली दुकाने, अरुंद रस्ता, बेकाबू झालेले भक्त (धोंड) यांचे मोठी संख्या यामुळे झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
'दै. पुढारी'च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष शिरगावला जाऊन चेंगराचेंगरी झालेल्या जागेला भेट देऊन व स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. यावेळी नागरिकांनी सांगितले की, रात्री बाराच्या सुमारास जवळच उताराच्या खाली असलेले होमकुंड पेटवले जाते. त्यानंतर धोंड देवीच्या हमूळ स्थानाजवळ असलेल्या तळीमध्ये स्नान करायला जातात. व त्यानंतर या होमकुंडातून अग्नी दिव्य करुन कोळश्यावरुन चालत जाऊन आपल्या व्रताची समाप्ती करतात. तळीमध्ये अंघोळ करून येणारे हजारो धोंड व आंघोळीसाठी तळीकडे जाणारे शेकडो धोंड यांच्यात पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी अरुंद रस्ता व दाटीवाटीने दुकाने असलेल्या चढावावर बाचाबाची झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. या बाचाबाचीवेळी मागून मोठ्या संख्येने उंचावरून येणाऱ्या धोंड बेकाबू झाले व ढकलाढकली सुरू झाली. आणि अडचण असल्यामुळे काहीजण खाली पडले बेकाबू झालेले हजारो धोंड त्यांच्या अंगावरुन गेले. अनेकांना काहीजण खाली पडले हे माहित नव्हते. आणि या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे कळते.
या मृत्यूची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता अडीच ते तीन मीटर रुंदीचा येथे रस्ता आहे. मात्र, या रस्त्याला टेकूनच अनेक दुकाने थाटली गेली होती. ही दुकाने येथे जास्त अडचण करणारी ठरली. जर तेथे ऐसपैस जागा असती तर ही चेंगराचेंगरी झाली नसती. मात्र, स्थानिक पंचायत, देवस्थान समिती मिळेल तेथे दुकाने थाटण्यास परवानगी देतात, काही नागरिक आपल्या घरासमोर दुकाने थाटण्यास परवानगी देऊन भाडे घेत असल्याचे कळते. अरुंद रस्ता, बाजूची दुकाने आणि बेकाबू झालेले धोंड ही या चेंगराचेंगरीची प्रमुख कारणे असल्याचे अनेकांनी सांगितले. एकही स्थानिक पोलिसांना दोष देत नाही. येथे पोलीस होते. मात्र, ते बेकाबू धोंडांना काहीच करु शकले नाहीत, असे स्थानिक म्हणाले.
शिरगाव येथील श्री लईराईची जत्रा ही गोव्यातील सर्वात जास्त गर्दीची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. पाच दिवस चालणारा हा जत्रोत्सव शुक्रवारी (दि. २) सुरू झालेला आहे. पुढील चार दिवस कौलोत्सव होईल. पहिल्या दिवशी सकाळपासून महिनाभर व्रतस्थ राहिलेले धोंड तथा भक्त हातामध्ये सजवलेल्या वेताच्या काठ्या घेऊन देवीच्या दर्शनाला जातात. त्यापूर्वी ते देवीच्या मूळ स्थानाजवळच्या तळीमध्ये अंघोळ करतात तळी ते मंदिर या एक किलोमीटर रस्त्यावर मध्ये होमकुंड असते. मात्र, या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली जातात. दुकानांना परवानगी कोण देते, असा प्रश्न यावेळी करण्यात आला. त्यावेळी काही दुकाने पंचायतींच्या परवानगीने, काही देवस्थानाच्या तर घराच्या समोर काही जागा घरमालक भाड्याने देतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे या तीनही घटकांनी भाड्याच्या लोभापायी अडचणीत दुकाने थाटण्यास दिल्याचे दिसून आले. पहिल्यांदाच हा दुर्दैवी प्रकार घडल्यामुळे भाविकच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज (दि.३) घटनास्थळी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लईराई देवीच्या जत्रोत्सवात पहिल्यांदाच ही दुदैवी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीची कारणे शोधली जातील, आणि त्यावर उपाययोजना केल्या जातील.