

डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवाला मंगळवारी २१ रोजी उदंड उत्साहात प्रारंभझाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी गोमंतकीय जनतेला उत्तम आरोग्य, समृद्धी लाभावी, अशी आपण प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने अतिशय नेटके आयोजन केलेले आहे. गेले काही महिने आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हाधिकारी, पोलिस दल, अग्निशमन दल व प्रशासकीय यंत्रणा तयारीत गुंतले होते. मंगळवारी रात्री होणारे अग्नीदिव्य व इतर सर्व विधी निर्विघ्नपणे संपन्न व्हावा, यासाठी भाविक व धोंडांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. जत्रोत्सवासाठी यावर्षी प्रशासनाने अॅक्शन प्लान तयार केलेला असून शिस्तीत दर्शन घेणे शक्य व्हावे, यासाठी अनेक प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आवश्यक तरतुदी केल्या आहेत.
भाविकांनी जत्रोत्सवात शिस्तीचे पालन करणे गरजेचे असून सर्वांनी संघटितपणे हा उत्सव अतिशय नेटक्या स्वरूपात पार पाडावा, यासाठी जवाबदारी स्वीकारण्याचा आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हजारो भाविकांनी घेतले दर्शन
राज्यातील विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच गोवा व इतर राज्यांतील हजारो भाविकांनी दिवसभर देवीचे दर्शन घेतले. परिसरात कसलीच फेरी नसल्याने रस्ते मोकळे असून भाविकांची चांगली सोय झाल्याचे दिसून आले. उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, पोलिस निरीक्षक विजय राणे हे नेटके आयोजन करण्यात गुंतले आहेत. वाहतूक व्यवस्था, पार्किंग याबाबतही चोख नियोजन केले आहे.