

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
इंडियन प्रीमियर लीग मधील सामन्यांवर बेकायदेशीरपणे सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा वेर्णा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सांकवाळ येथील एका भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या या सट्टेबाजीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील चार संशयितांना रंगेहाथ पकडले व चौकशीअंती त्यांना अटक केली.
चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या सामन्यावर हे संशयित सट्टा स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेर्णा पोलिसांनी ११ एप्रिल रोजी रात्री १०.४० ते १२ एप्रिलच्या पहाटे ३.३० वाजेपर्यंत सांकवाळ येथील शिंदोली भागातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर ही मोहीम राबवली.
अटकेत असलेल्या संशयितांची प्रांजल तिवारी (२३, उत्तर प्रदेश), अमर दावडा (३३, छत्तीसगड), शशांक कुमार साहू (१९, उत्तर प्रदेश) आणि संदीप सिंग (२३, उत्तर प्रदेश) अशी नावे आहेत. हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून सांकवाळ परिसरात भाड्याने राहत होते आणि तिथूनच आपले सट्टेबाजीचे व्यवहार चालवत होते.
या छाप्यात पोलिसांनी सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे १० मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, एक टॅबलेट, इंटरनेट राउटर आणि ३७ हजार रुपयांची रोकड असा एकूण २.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वेर्णा पोलीस ठाण्यात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयपीएल हंगामात गोव्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे परप्रांतीय टोळ्या सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. ही कारवाई वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रिस्ली काव्र्हालो आणि त्यांच्या पथकाने केली.